महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर राहणार; मंत्री दादा भुसेंच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यामुळे वाढल्या अडचणी

•सामना मधील ‘त्या’ वादग्रस्त मजकुरावरून फौजदारी खटला; 12 हजारांच्या दंडानंतर राऊतांची न्यायालयात उपस्थिती

मालेगाव :- शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर राहणार आहेत. राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्यात 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप करणारा मजकूर ‘सामना’मध्ये प्रसिद्ध केल्याप्रकरणी हा खटला सुरू आहे. यापूर्वी अनेकदा सुनावणीला हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने संजय राऊत यांना 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता, त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे आरोप-प्रत्यारोप झाले होते. याच काळात संजय राऊत यांनी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. गिरणा ॲग्रो नावाने शेतकऱ्यांकडून 178 कोटी 25 लाख रुपयांचे शेअर्स गोळा करण्यात आले, परंतु कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाख रुपयेच 47 सभासदांच्या नावावर दिसत असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. ही शेतकऱ्यांची मोठी लूट असून लवकरच याचा स्फोट होईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. हा मजकूर पूर्णतः बदनामीकारक असून आपली प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत मंत्री दादा भुसे यांनी राऊतांविरुद्ध अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला.

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना दादा भुसे यांनी यापूर्वीच सांगितले आहे की, गेल्या दहा-बारा वर्षांपूर्वी मालेगाव तालुक्यातील गिरणा सहकारी साखर कारखाना डीआरटी कोर्टाच्या माध्यमातून लिलावात निघाला होता. त्यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावातून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शेअर्स गोळा केले होते, मात्र मोठी रक्कम उभी राहू शकली नाही. अखेर जमा झालेली रक्कम कायदेशीररित्या आरटीजीएस करण्यात आली होती. संजय राऊत यांनी केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा भुसे यांनी केला आहे. आजच्या या न्यायालयीन प्रक्रियेमुळे मालेगावमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून दोन्ही बाजूंचे समर्थक न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0