
Sanjay Raut On Eknath Shinde : ठाकरे बंधूंच्या युतीतील दुराव्यानंतर राऊतांची तिखट प्रतिक्रिया; ‘बेईमानी’ आणि ‘खंजीर’ शब्दांचा वापर करत शिंदेंवर निशाणा
मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यात काल ‘नंदनवन’ बंगल्यावर झालेली भेट राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीवर शिवसेना (ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अत्यंत जहाल शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असून हे नंदनवन बेईमानीतून उभे राहिले आहे,” असा घणाघाती आरोप राऊतांनी आज केला.
आम्ही हेरगिरी करत नाही – संजय राऊत
नेहमीप्रमाणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “कोण कोणाला भेटतं यावर आमचे बंधन नाही आणि आम्ही त्याची हेरगिरीही करत नाही. हा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंनाच विचारावा. मात्र, आमचे भांडण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीशी आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली आहे आणि त्यामागे मोदी-शाहांचा विचार आहे.”
भेटीमागचे नेमके गणित काय?
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच भेट होती. या भेटीत प्रामुख्याने कल्याण-डोंबिवली (KDMC) निवडणुकीच्या निकालांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदेंनी मानले आभार
कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेसेनेला पाठिंबा देऊन सत्तेचा मार्ग मोकळा केला, त्याबद्दल एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंचे आभार मानले.
सहकार्याचे आश्वासन: राज ठाकरे यांनीही महापालिका सभागृहाच्या कामकाजात मनसेचे पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन एकनाथ शिंदेंना दिल्याचे समजते.
ठाकरे बंधूंच्या युतीला तडा?
गेल्या वर्षी राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली होती, मात्र महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मनसेने शिंदेंना दिलेली साथ आणि आता झालेली ही भेट यामुळे ही युती धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. संजय राऊत यांच्या विधानामुळे ठाकरे गटाने आता राज ठाकरेंच्या भूमिकेवरही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केल्याचे मानले जात आहे.



