मुंबई

Mumbai News : मराठवाड्याला पावसाचा हाहाकार; ढगफुटीसदृश्य पावसाने शेती पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

•बीड आणि धाराशिवमध्ये नद्यांना पूर, बाजारपेठांसह घरांमध्ये शिरले पाणी; शेतीचे अतोनात नुकसान

मुंबई :- राज्यात सध्या पावसाने थैमान घातले असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला आहे. लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये रात्रीतून झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नद्या-नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, शेतजमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत.

बीड आणि धाराशिवमध्ये पूरसदृश्य परिस्थिती

बीड जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा रौद्र रूप धारण केले. शिरूर कासारमध्ये झालेल्या दमदार पावसाने सिंदफणा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. बाजारपेठ पूर्णपणे जलमय झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात चांदणी नदीला महापूर आल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शिरसाव गावाजवळील नदीला पूर आल्याने पलीकडील सुमारे 200-300 लोक अडकून पडले आहेत, त्यांच्या मदतीसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

पिके पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला

परभणी जिल्ह्यात काल रात्री झालेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पारंपरिक पिकांसह नगदी पिकेही शेतकऱ्यांच्या हातातून निसटली आहेत. रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूरमधील भेटा-अंदोरा गावचा संपर्क तुटला असून, पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातही हीच परिस्थिती असून, नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. शेती पिके पाण्याखाली बुडाली असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, शासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्तांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0