मुंबई

Fake Stamp Scam : ‘तेलगी’ स्टाईलने बनावट स्टॅम्पचा काळाबाजार! मुंबई पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; 8 कोटींची उलाढाल उघड

•दिल्ली-बिहारमध्ये छापेमारी करत 5 आरोपींना अटक; 27 लाखांचा मुद्देमाल जप्त आणि 14 दिवसांच्या ‘फिल्डिंग’नंतर मुख्य सूत्रधार जेरबंद

मुंबई | मुंबईच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग (MRA Marg) पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा छडा लावला असून, बनावट पोस्टल स्टॅम्प छापून ते देशभर विकणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई जीपीओच्या डाक निरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या तपासाचा धागा आता थेट दिल्ली आणि बिहारपर्यंत पोहोचला आहे.

तपासाची चक्रे फिरली; 5 पत्रांनी उघडला घोटाळा

मुंबई जीपीओतून पाठवण्यात आलेल्या 5 पत्रांवर बनावट स्टॅम्प आढळल्यानंतर डाक विभागाने पोलिसांकडे धाव घेतली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले.अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये 7 ते 8 कोटी रुपयांची संशयास्पद उलाढाल आढळून आली आहे.
विक्रीची पद्धत: हे आरोपी बनावट स्टॅम्प तयार करून ते मागणीनुसार कुरिअरमार्फत विविध राज्यांत अर्ध्या किमतीत विकत होते.

दिल्लीत 14 दिवस पाळत ठेवून कारवाई

या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार दिल्लीत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथकाने तिथे तळ ठोकला होता. आरोपी वारंवार आपले ठिकाण आणि मोबाईल क्रमांक बदलून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर, सलग 14 दिवस पाळत ठेवून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 27 लाख 84 हजार 200 रुपयांचे बनावट स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी

1.राकेश बिंद (मुंबई)

2.शमशोद्दीन गफार (बिहार)

3.शाहीद रजा (बिहार)

4.मोहम्मद शहाबुद्दीन शेख (दिल्ली – मुख्य सूत्रधार)

5.विरेंदर प्रसाद (गाझियाबाद – मुख्य सूत्रधार)

तेलगी प्रकरणाची आठवण

या घोटाळ्याची कार्यपद्धती पाहता, अनेकांना पुन्हा एकदा 2003 मध्ये गाजलेल्या अब्दुल करीम तेलगी स्टॅम्प घोटाळ्याची आठवण झाली आहे. तेलगीने ज्याप्रमाणे सरकारी यंत्रणेला चकवा देऊन समांतर स्टॅम्प बाजार उभा केला होता, तसेच काहीसे प्रयत्न या टोळीकडूनही सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0