क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

CIDCO Bribe News : सिडकोचा मोठा मासा ‘एसीबी’च्या जाळ्यात!

Navi Mumbai CIDCO Bribe News : 2 लाखांची लाच घेताना वसाहत अधिकारी आणि खासगी इसम रंगेहात अटकेत

नेरूळ | सिडकोच्या नेरूळ विभागीय कार्यालयात सदनिका हस्तांतराच्या नावाखाली सुरू असलेल्या वसुलीच्या धंद्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पर्दाफाश केला आहे. प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी शैलेश घरत यांनी एका खासगी इसमाच्या मदतीने रचलेला भ्रष्टाचाराचा सापळा त्यांच्यावरच उलटला. 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना खासगी मध्यस्थाला रंगेहात पकडल्यानंतर, एसीबीने सिडको कार्यालयातून मुख्य सूत्रधार घरत यांना बेड्या ठोकल्या आहेत.

सव्वा लाखांचे काम आणि चार लाखांची ‘मागणी’

या प्रकरणातील तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून ते सिडको ट्रान्सफरची कायदेशीर कामे पाहतात. सानपाडा येथील एका सदनिकेच्या हस्तांतरासाठी (Transfer) त्यांनी जून 2025 मध्ये ऑनलाईन अर्ज केला होता. मात्र, नियमानुसार काम करण्याऐवजी प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी शैलेश घरत यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी चक्क 4 लाख रुपयांची मागणी केली. लाचेची ही अव्वाच्या सव्वा रक्कम ऐकून तक्रारदाराने भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आणि नवी मुंबई एसीबीकडे धाव घेतली.

हॉटेल नवमीमध्ये रंगला अटकेचा थरार

एसीबीच्या पथकाने 27 जानेवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली असता, घरत यांनी खासगी इसम नागेंद्र पांडे याच्यामार्फत 2 लाख रुपये स्वीकारण्याचे कबूल केल्याचे उघड झाले. 28 जानेवारी रोजी नेरूळ रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल नवमीमध्ये सापळा रचण्यात आला. दुपारीच्या सुमारास, घरत यांच्या सांगण्यावरून नागेंद्र पांडे याने तक्रारदाराकडून 2 लाख रुपयांची थप्पी स्वीकारली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून पांडेला रंगेहात पकडले. या यशस्वी सापळ्यानंतर पथकाने थेट सिडको कार्यालय गाठून मुख्य आरोपी शैलेश घरत यांनाही ताब्यात घेतले.

सिडको वर्तुळात मोठी खळबळ

एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कार्यालयातूनच ताब्यात घेतल्याने सिडकोच्या नेरूळ कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. शैलेश घरत (57 वय) आणि खासगी मध्यस्थ नागेंद्र पांडे (58 वय) या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सिडकोतील इतर लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम

अँन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई पार पडली. नवी मुंबई एसीबीच्या पथकाने केलेल्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी पैसे मागितल्यास तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0