ठाणे

Thane Crime News : ठाणे पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार! 5 हजार अतिरिक्त बळाची मागणी; गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका

•ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगरमध्ये पोलिसांचा कडा पहारा; संवेदनशील बुथवर विशेष लक्ष

ठाणे :- आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, भिवंडी-निजामपूर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या चार मोठ्या महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी बंदोबस्ताचा ताण लक्षात घेता, पोलिसांनी गृहविभागाकडे अतिरिक्त कुमकेची मागणी केली आहे.

अतिरिक्त 5 हजार पोलिसांची फौज

ठाणे पोलीस आयुक्तालयाचे सध्याचे मनुष्यबळ सुमारे 8,500 इतके आहे. मात्र, चारही महापालिका क्षेत्रांतील भौगोलिक व्याप्ती आणि संवेदनशील केंद्र पाहता, पोलिसांना अतिरिक्त बळाची गरज आहे.

फौजफाटा: पोलिसांनी 5 हजार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.

होमगार्ड: यामध्ये 3 हजार गृहरक्षकांचा (Home Guards) समावेश असेल.

SRPF: मतदानाच्या दिवशी आणि निकालावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्याही तैनात केल्या जाणार आहेत.

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात

सह-पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीत अडथळा ठरू शकणाऱ्या समाजकंटकांविरोधात पोलिसांनी आतापासूनच मोहीम उघडली आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई: ज्यांच्यावर दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

तडीपार गुन्हेगार: तडीपार घोषित केलेले गुन्हेगार शहरात आहेत का, याची तपासणी करण्यासाठी हॉटेल, लॉज आणि घरांची झाडाझडती घेतली जात आहे.

रात्रीची नाकाबंदी: शहरात ठिकठिकाणी रात्रीची नाकाबंदी वाढवण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जात आहे.

संवेदनशील बुथवर ‘वॉच’

चारही महापालिका क्षेत्रांतील राजकीय पार्श्वभूमी पाहता, काही भाग ‘संवेदनशील’ म्हणून ओळखले जातात. या भागांतील मतदान केंद्रांची पाहणी स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत. निवडणुकीच्या काळात पैशांचे वाटप, मद्य वाटप किंवा धाकदपटशा यांसारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी ‘फ्लाईंग स्क्वॉड्स’ही तैनात केले आहेत.

डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, सह-आयुक्त, ठाणे पोलीस, यांनी,”निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लवकरच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त दाखल होईल.गुन्हेगारांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली असून, भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0