मुंबई

Rohit Pawar : मुंबईत पोलिसांवर हात! – कांदिवलीत गुंडांकडून पोलिसांना मारहाण; रोहित पवारांनी व्हिडिओ शेअर करत कायदा-सुव्यवस्थेवर उपस्थित केला प्रश्न

•एकता नगरमधील हाणामारी सोडवताना पोलिसांशी हुज्जत; वर्दीवर हात टाकण्याच्या घटनेने संताप; ‘गुंडांची मस्ती जिरवावी’ – रोहित पवार

मुंबई :- मुंबईतील कांदिवली परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकता नगर परिसरात दोन गटातील हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला काही स्थानिक गुंडांनी थेट मारहाण करत त्यांची कॉलर पकडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हा व्हिडिओ ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

रोहित पवारांची थेट टीका

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “निवडणुकीसाठी गुंडांचा वापर केल्यामुळं सरकारही आमचंच असल्याचा गुंडांचा समज झाला आहे आणि यातूनच थेट पोलिसांच्या वर्दीवर हात टाकण्यापर्यंत त्यांची डेअरिंग वाढू लागलीय.”

पवार यांनी पुढे म्हटले, “पोलिसांना मारहाण करण्याचा कांदिवलीतील हा प्रकारही याच पठडीतला दिसतोय. अशा पद्धतीने पोलिसांचा वचक कमी होत गेला तर गल्लोगल्लीत गुंडांचा सुळसुळाट होऊन सामान्य माणसाला श्वास घेणंही कठीण होईल. या गुंडांची मस्ती जिरवण्याची धमक पोलिसांमध्ये आहे, पण त्यासाठी सरकारनेही पोलिसांना मोकळीक द्यावी. आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीशी आहोत.”

नेमके काय घडले?

ही घटना कांदिवलीच्या एकता नगर परिसरात घडली.दोन गटात झालेल्या हाणामारीची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी दोन्ही गटांतील वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच, तेथे जमलेल्या काही गुंडांनी थेट पोलिसांची कॉलर पकडत त्यांना मारहाण केली आणि हुज्जत घातली.
या घटनेवेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली दिसत होती.

गुंडांकडून थेट पोलिसांना मारहाण झाल्यामुळे संताप व्यक्त होत असून, मुंबईसारख्या शहरात पोलिसांवरील वचक कमी होत असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0