Eknath Shinde Meet Amit Shah : महायुतीत ‘ऑल इज वेल’ नाही! शिंदे गटाच्या मंत्र्यांची नाराजी; एकनाथ शिंदे थेट दिल्लीत अमित शहांना भेटले

• फडणवीस-अजित पवारांची ‘वर्षा’वर तातडीची बैठक; ‘नाराजी वाढल्यास काय करायचे?’ यावरही चर्चा झाल्याची माहिती
मुंबई :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) वादाची ठिणगी पडली असून, या वादाचा भडका मंत्रिमंडळ बैठकीतही पाहायला मिळाला. शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे.
शिंदे गटाचे सर्व मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीनंतर दोनच दिवसांनी एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले आणि त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. नाराजीचे मुख्य कारण म्हणजे, स्थानिक पातळीवर महायुतीतील नेत्यांकडून पक्षांतर घडवून आणले जात आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी कुटुंबात वाद विवाद होत राहतात, असे सांगत नाराजी कमी झाल्याचे स्पष्ट केले होते आणि महायुतीतील नेत्यांनी एकमेकांच्या पक्षात प्रवेश न देण्यावर चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचे कळताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत शिवसेना पक्षातील मंत्री आणि एकनाथ शिंदे यांची वाढती नाराजी दूर कशी करायची, यावर चर्चा झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढत गेलीच तर पुढं काय करायचं, याबद्दलही बैठकीत चर्चा झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.
या घडामोडींमुळे महायुतीमध्ये ‘ऑल इज वेल’ नसल्याचे उघड झाले आहे. एकनाथ शिंदे अमित शाह यांच्या भेटीनंतर बिहार विधानसभा निवडणुकीतील एनडीएच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी बिहारला जाण्याची शक्यता आहे.


