मुंबई

Maharashtra Politics : कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का! खासदार श्रीकांत शिंदेंचे खंदे समर्थक महेश पाटील भाजपमध्ये

•27 गाव परिसरातील वजनदार नगरसेवक भाजपच्या गोटात; बहिणीसह शेकडो कार्यकर्त्यांचे ‘कमळ’ हाती, ‘घुसमट’ झाल्याची चर्चा

डोंबिवली :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिंदे गटाला सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का दिला आहे. डोंबिवली शहरातील वजनदार नगरसेवक आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले महेश पाटील यांनी आज (मंगळवार) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांची बहीण, शिंदे शिवसेनेतील माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील आणि सायली विचारे यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचे कमळ हातात घेतले.

घुसमट आणि भाजप प्रवेश

महेश पाटील हे डोंबिवली पूर्वेतील आजदे, सागर्ली आणि 27 गाव परिसरात मोठे वर्चस्व ठेवून आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदे शिवसेनेला या महत्त्वाच्या पट्ट्यात मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

पाटील समर्थकांमध्ये चर्चा आहे की, मागील काही महिन्यांपासून महेश पाटील यांची शिंदे शिवसेनेत घुसमट सुरू होती. शिंदेसेनेतील एका विकासपुरूष नेता आणि त्यांच्या चाणाक्याच्या चढेगिरी कार्यपध्दतीला ते कंटाळले होते.

काही महिन्यांपूर्वी वास्तुशांतीच्या कार्यक्रमात महेश पाटील यांनी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याजवळ आपली घुसमट बोलून दाखवली होती, तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती.

गुप्ततेने पार पडला सोहळा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वामन म्हात्रे यांच्या मुलाच्या प्रवेशानंतर भाजपने महेश पाटील यांच्या प्रवेशाविषयी कमालीची गुप्तता पाळली होती. चव्हाण थेट महेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचल्यानंतरच हा प्रवेश निश्चित झाला.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण परिसरात येताच, महेश पाटील समर्थकांनी मोबाईलवर मोठ्या आवाजात ‘लाख मोलाच्या जनतेचा, रवी दादावर जीव हाय रे’ हे गाणे वाजवून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपचे दीपेश म्हात्रे आणि मंदार हळबे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

कल्याण-डोंबिवलीतील दोन महत्त्वपूर्ण घराणी भाजपने सलग दुसऱ्या दिवशी आपल्याकडे खेचल्याने शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0