Thackeray Group : ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चौघांवर 5 कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा

Devgiri Bank Scam : देवगिरी बँकेला गंडा घातल्याचा आरोप; मशिनरी परस्पर विकल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलिसात FIR दाखल
छत्रपती संभाजीनगर :- शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला मोठा राजकीय आणि कायदेशीर धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल 5 कोटी 33 लाख 85 हजार 356 रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्याने ते कर्ज एनपीए (NPA) झाले होते. बँकेकडून संधी देऊनही परतफेड न केल्याने बँकेने कार्यवाही सुरू केली. मात्र, याच दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगनमताने विकल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे.
बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या नोंदीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच मंत्री गिरीश महाजन आणि उन्मेष पाटील यांच्यात भूखंड प्रकरणावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगले होते. त्यावेळी महाजन यांनी पाटील यांच्यावर स्टेट बँकेसह अन्य एका बँकेला गंडवल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर अवघ्या तीन दिवसांनीच हा गुन्हा दाखल झाला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे ठाकरे गटासाठी ही मोठी अडचण मानली जात आहे.


