मुंबईठाणे
Trending

Avinash Jadhav : “तुषार आपटेचा राजीनामा घ्या, अन्यथा गाठ मनसेशी!”; अविनाश जाधवांचा भाजपला बदलापूरमधून इशारा

Avinash Jadhav On Tushar Apte : विकृत मानसिकतेच्या लोकांना पक्षात स्थान देताना लाज वाटत नाही का? अविनाश जाधवांचा रोकडा सवाल; 13 जानेवारीला महामोर्चा काढणार.

ठाणे/बदलापूर | बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांची भाजपने स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे. या नियुक्तीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, “भाजपने तातडीने आपटे यांचा राजीनामा घेतला नाही, तर बदलापूरमध्ये मनसेचा महामोर्चा धडकेल,” असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

भाजपच्या मानसिकतेवर प्रहार

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अविनाश जाधव यांनी भाजपवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, “स्वतःला पांढरपेशा म्हणवून घेणाऱ्या भाजपची मानसिकता आता जगासमोर आली आहे. ज्या शाळेत लहान मुलींवर अत्याचार झाला, त्या प्रकरणातील सहआरोपीला नगरसेवकपद देऊन भाजप नेमका काय संदेश देऊ इच्छितो? हजारो लोक जेव्हा रेल्वे ट्रॅकवर उतरले होते, तेव्हाच्या जनभावनेचा भाजपला विसर पडला आहे का?”

‘संघाशी निगडित आहे म्हणून गुन्हे माफ का?’

अविनाश जाधव यांनी अत्यंत आक्रमक सवाल उपस्थित करत विचारले की, “तुषार आपटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित आहेत म्हणून त्यांचे सर्व गुन्हे माफ आहेत का? त्या लहान मुलींचा आणि त्यांच्या पालकांचा विचार करा. जर हे भाजपच्या नेत्यांच्या मुलांबाबत घडले असते, तर त्यांनी असेच केले असते का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, जो माणूस गुन्हा दाखल झाल्यावर 44 दिवस पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता, त्याला सन्मानाने सभागृहात बसवणे हा पीडितांचा अपमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आंदोलनाचा इशारा

मनसेच्या वतीने भाजपला स्पष्ट अल्टिमेटम देण्यात आला आहे. येत्या 13 किंवा 14 जानेवारीपर्यंत तुषार आपटे यांचा राजीनामा घेतला गेला नाही, तर बदलापूरच्या रस्त्यांवर मनसेचे कार्यकर्ते उतरतील आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे जाधव यांनी जाहीर केले.

प्रकरणाची पार्श्वभूमी

कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या पहिल्या सभेत पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली, ज्यात भाजपच्या कोट्यातून तुषार आपटे यांची निवड करण्यात आली. आपटे हे अत्याचार घडलेल्या शाळेचे सचिव होते आणि पुरावे लपवल्याचा तसेच निष्काळजीपणाचा त्यांच्यावर ठपका आहे. सध्या ते जामिनावर बाहेर असले तरी त्यांच्यावरील खटला अद्याप सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0