मुंबई

Keshav Upadhyay : ‘सत्याचा मोर्चा’ नाही, तर ‘अपयशाच्या कबुलीचा मोर्चा’; भाजपने मविआ आणि राज ठाकरेंवर साधला निशाणा!

•भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल; “लोकसभा विजयानंतर याद्या चांगल्या होत्या, आताच शंका का?”

मुंबई :- मतदार याद्यांमधील कथित घोळ, दुबार मतदार आणि मतचोरीच्या मुद्यावर महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे यांनी आज (1 नोव्हेंबर) मुंबईत पुकारलेल्या ‘सत्याचा मोर्चा’ वर भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हा मोर्चा म्हणजे विरोधी पक्षांच्या अपयशाची आणि नाकर्तेपणाची जाहीर कबुली असल्याचा पलटवार केला आहे.

अपयशाच्या कबुलीचा मोर्चा

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पोस्टद्वारे विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “सत्याचा मोर्चा’ असा नकली चेहरा चढवून महाविकास आघाडी आज आपल्या अपयशाच्या कबुलीचा मोर्चा काढत आहे. आम्ही अपयशी आहोत, बेजबाबदार आहोत, नाकर्ते आहोत याची जाहीर कबुली आज मविआचे नेते उद्धव ठाकरे, राज ठाकरे व अन्य मंडळी देतील.”

उपाध्ये यांनी थेट ठाकरे बंधूंना प्रश्न विचारला: “लोकसभा निवडणुकीत ज्या मतदार यादीने विजयाचा अनपेक्षित धक्का दिला, ती यादी आता महापालिकेला अजिबात नको, कारण? विधानसभेला पराभव झाला. अशा कारणासाठी मोर्चे काढून आपल्या दुटप्पीपणाचे प्रदर्शन करण्याचे धाडस आज ठाकरे बंधू करणार आहेत.”

भाजपचे 3 कळीचे प्रश्न

केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी आणि मनसेला तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत:

मतदान केंद्रावर आक्षेप का नाही? – महाराष्ट्रात विधानसभेला 1 लाख बूथ होते. आज मोर्चा काढणाऱ्या पक्षांच्या पोलिंग एजंटपैकी 1 टक्का बुथवर तरी (म्हणजे 1000 बुथवर) मतदानाच्या वेळी आक्षेप घेतले गेले होते का?

मतदार यादी प्रारूपावर आक्षेप कुठे होते? – मतदार यादी प्रारूप प्रकाशित होते, तेव्हा आज मोर्चा काढणाऱ्या किती जणांनी मतदार यादीवर आक्षेप नोंदविले होते?

लोकसभेनंतर आवाज का नाही? – दुबार मतदार, बोगस मतदार दूर केलेच पाहिजेत, पण आज मोर्चा काढणाऱ्या किती जणांनी लोकसभा निवडणूकीनंतर याबद्दल आवाज उठविला होता?

‘भरकटलेल्या, हतबल नेत्यांचा मोर्चा’

शेवटी उपाध्ये यांनी या मोर्चावर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “‘अपयश ठेवायचे झाकून आणि यादीत बघायचे वाकून’ हा पोरखेळ मतदार ओळखून आहेत. काँग्रेसमध्ये कुणी टिकत नाहीये, शरद पवार गटात कुणी थांबायला तयार नाही, राज ठाकरेंचा यशाचा सूर कधीच हरवलाय आणि भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी विश्वास गमावलाय. अशा, भरकटलेल्या, हतबल नेत्यांचा हा मोर्चा ‘सत्याचा’ नाही, हा तर अपयशाच्या, नाकर्तेपणाच्या कबुलीचा मोर्चा आहे.”

आज फॅशन स्ट्रीटहून निघालेला हा मोर्चा मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिका मुख्यालयावर पोहोचणार आहे, जिथे उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह काँग्रेसची नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0