मुंबई

Navi Mumbai News : बिवलकर 5000 कोटी जमीन घोटाळा : ‘पोलिसांवर वरून दबाव’ – रोहित पवारांचा गंभीर आरोप

•वन विभागाचे पत्र देऊनही गुन्हा दाखल नाही; नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी फेटाळले आरोप

नवी मुंबई :- सिडकोच्या 5 हजार कोटी रुपयांच्या वादग्रस्त जमीन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मात्र, वन विभागाने 17 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलिसांना देऊनही कारवाई झाली नसल्यामुळे या भेटीनंतर त्यांनी थेट पोलीस प्रशासनावरच ‘वरिष्ठ स्तरावरून दबाव’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. सिडकोने ही जमीन तात्काळ परत घेऊन ती मूळ भूमिपुत्रांना द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणी यापूर्वी आंदोलने झाली असून, लोकायुक्तांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात सरकारवर ताशेरे ओढले आहेत, असे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्तांवर थेट टीका

वन विभागाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे पत्र देऊन 7 दिवस उलटले, तरीही कारवाई होत नसल्यामुळे रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, बिवलकर यांनी शासनाची जमीन हडपण्यासाठी विविध विभागांना फसवले आहे. तब्बल पाच हजार कोटींची जमीन मिळवण्यासाठी केवळ 22 दिवसांमध्ये 42 वेगवेगळ्या सरकारी टेबलावरून फाईलचा प्रवास झाला. या तत्परतेसाठी सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिरसाट कारणीभूत होते. सामान्य प्रकल्पग्रस्तांना भूखंड देताना अशी तत्परता का दाखविली जात नाही, असा सवालही त्यांनी केला.

या सर्व प्रकारासाठी पोलीस आयुक्त जबाबदारी पार पाडत नसल्याचे सांगत, त्यांच्यावर ‘वरच्या लोकांचा दबाव’ आहे. मुंबई महापालिका निवडणुका होईपर्यंत या प्रकरणात कोणतीही कारवाई होण्याची शक्यता दिसत नसल्याचे गंभीर वक्तव्यही आमदार पवार यांनी केले.

गृहमंत्री अमित शहांवरही दावा

दरम्यान, त्यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. गृहमंत्री अमित शहा ज्या भाजप कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते, तीच जमीन सध्या वादग्रस्त आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. या सर्व वक्तव्यांमुळे बिवलकर प्रकरणावरून सरकार आणि पोलीस प्रशासनावरचा दबाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या प्रकरणातील यशवंत बिवलकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी काही वेळाने प्रतिक्रिया देतो, असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0