Satara Crime News : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण : दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि छळाचे गंभीर आरोप

•आत्महत्येपूर्वी हातावरच लिहिली ‘सुसाईड नोट’; पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर ठपका
सातारा :- साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने अत्यंत धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून त्यात थेट दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या गंभीर आरोपामुळे संपूर्ण सातारा जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमधील आरोप
गुरुवारी रात्री महिला डॉक्टरने आत्महत्या केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर, त्यांच्या हातावर सुसाईड नोटच्या स्वरूपात लिहिलेला मजकूर आढळला. यात त्यांनी नमूद केले आहे की,
“पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला.”
“पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला.”
तक्रारीकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष?
महिला डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलीस आणि आरोग्य विभागातील अंतर्गत वादात अडकल्या होत्या. त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान, त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी तक्रार देत ‘माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन’ असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यांच्या या गंभीर तक्रारीची वरिष्ठांनी ठोस दखल घेतली नाही, असा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे.
राजकीय प्रतिक्रिया
शंभूराज देसाई (पालकमंत्री): “घटनेची माहिती मिळताच मी एसपींशी (अधीक्षक) बोललो आहे. सुसाईड नोट आढळल्यास ते अत्यंत खेदजनक आहे. या प्रकरणाचा खोलवर तपास करून सर्व पुरावे गोळा केले जातील. जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल.”
सुप्रिया सुळे (खासदार, राष्ट्रवादी-शरद पवार गट): “ही घटना अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी दोषी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
सुषमा अंधारे (उपनेत्या, ठाकरे गट): “ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आणि त्याच खात्याचे अधिकारी जर पिळवणुकीचे वाहक होणार असतील, तर ‘कुंपणच शेत खात आहे’ अशी स्थिती आली आहे.”



