
Raj Thackeray & Saliam Khan : शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट; राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सलीम खान गप्पांमध्ये रमलेले दिसले
मुंबई :- बॉलिवूडचे दिग्गज पटकथालेखक आणि अभिनेते सलमान खान Salman Khan यांचे वडील सलीम खान Salim Khan यांनी आज (गुरुवार) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय आणि सिनेसृष्टीच्या वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सलीम खान आणि राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यानचे छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यात राज ठाकरे, त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि सलीम खान हे ‘शिवतीर्थ’च्या बाल्कनीत हसत-गप्पा मारताना दिसत आहेत. या भेटीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जुने मैत्रीपूर्ण संबंध:
राज ठाकरे आणि सलीम खान यांचे संबंध केवळ राजकीय किंवा औपचारिक नसून जुने मैत्रीपूर्ण नाते आहे. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनीही सलमान खानच्या निवासस्थानी जाऊन संवाद साधला होता. त्यामुळे आजची ही भेट सदिच्छा आणि आपुलकीची असल्याचे मानले जात आहे. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी सलीम खान यांना आपले ‘शिवतीर्थ’ निवासस्थान दाखवून दिले.
राज ठाकरे हे स्वतः कलाप्रेमी आणि सिनेमा रसिक असल्याने त्यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी कलाविश्वातील व्यक्तिमत्त्वांचे सतत येणे-जाणे असते. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही भेट सदिच्छा भेट असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या भेटीमुळे राजकीय आणि सिने-वर्तुळात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. दरवर्षी मनसेतर्फे शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा केला जातो, ज्यात चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज हजेरी लावतात.
यावर्षी मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे आज राज ठाकरे आणि सलीम खान यांच्यात झालेल्या भेटीमुळे, सलीम खान हे देखील दीपोत्सवाला उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित राहणार का, याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.



