मुंबई

Aaditya Thackeray : “महाराष्ट्रात निवडणूक नाही म्हणून दुर्लक्ष!” अतिवृष्टीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार मदतीची आदित्य ठाकरेंची मागणी

•सर्वाधिक जीएसटी देऊनही राज्याला मदतीपासून वंचित ठेवले; ‘शेतकऱ्यांचा आवाज सरकारमधील कोणाच्याही कानापर्यंत पोहोचत नाही’

मुंबई :- राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीस आला असताना, शिवसेना (ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवाज या सरकारमधील कोणाच्याही कानापर्यंत पोहोचत नाही, इतके सरकारचे दुर्लक्ष सुरू आहे,” असे गंभीर विधान करत त्यांनी हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई आणि तातडीने कर्जमुक्ती देण्याची मागणी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या धोरणांवर थेट निशाणा साधला. बिहारमधील महिलांना निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आलेल्या 10 हजार रुपयांच्या मदतीचा दाखला देत त्यांनी महाराष्ट्राला मिळत असलेल्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उभे केले.

ते म्हणाले, “बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यामुळे मोदी सरकारने तेथील महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. ती आम्हाला मान्य आहे, पण महाराष्ट्रासारखे राज्य, जेथे निवडणुका नाहीत, जे देशातील सर्वात जास्त जीएसटी देते, त्या राज्याला मात्र मदतीसाठी केवळ आश्वासने मिळत आहेत.”

‘निवडणुका असत्या तर पैशांचा महापूर आला असता’

ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल करताना स्पष्ट केले की, आम्ही मागत असलेली मदत ही आमच्या हक्काची आहे. “सरकारने राज्यात त्वरित ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे आणि हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाईची घोषणा करावी.”

या मागण्या होत नसताना सरकार आपल्याच मस्तीत पुढे जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “ही दुर्दैवी गोष्ट आहे की, आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या, तर मदतीच्या पैशांचा महापूर आला असता. पण दुर्दैवाने आज महाराष्ट्रात निवडणुका नाहीत, त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारचा आवाज केंद्रात कुणीही ऐकत नाही,” असे ठाकरे म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीचा उल्लेख करत, शेतकऱ्यांच्या मदतीची मागील दोन-अडीच वर्षांतील सुमारे 15 हजार कोटी रुपयांची थकबाकी असून, हेच पैसे दुसऱ्या राज्यातील निवडणुकीत वापरले जात असल्याचा गंभीर आरोप केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0