Jalna News : मंत्री महोदय, ‘जळतंय ते कळतंय’; जालन्यात कृषीमंत्र्यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश, कुजलेली पिकं हातात देऊन विचारले जाब
•गेवराईमध्ये दत्तात्रय भरणे यांना रोषाचा सामना, अधिकाऱ्यांना फोनवरून झापले
जालना :- मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना बुधवारी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. गेवराई गावात शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पंधरा दिवसांपासून पाणी साचून पिके कुजली आहेत, जनावरांना चारा नाही, अशा अवस्थेत सरकारी यंत्रणा पंचनामे करत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांच्या हातात कुजलेली पिके दिली.
‘पंचनामे करा, अन्यथा कारवाई’
शेतकऱ्यांचा संताप पाहून कृषीमंत्री भरणे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला. “मी मंत्री म्हणून सांगतोय, ज्याचे नुकसान झाले आहे, त्याचा एक-एक गुंठ्याचा पंचनामा करा. शेतकऱ्याचा एकही गुंठा पंचनाम्याविना राहिल्यास तुम्ही जबाबदार असाल,” अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना झापले.
‘तुमचा रोष साहजिक आहे’
यावेळी भरणे यांनी संतप्त शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. “तुमचा रोष असणं साहजिक आहे. कारण ज्याचं जळतं, त्यालाच कळतं,” असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्याचे दाखवले. तसेच, “तुमच्या तालुक्यातील आणि गावातील एकाही गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही, याची मी हमी देतो,” असे आश्वासन त्यांनी दिले. वाहून गेलेली गुरे, मेंढरे आणि घरांच्या पडझडीसाठीही मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यापूर्वीच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगत, भरणे यांनी शेतकऱ्यांना मदत मिळेल असा विश्वास दिला. पण शेतकऱ्यांनी आपला संताप आणि आक्रोश व्यक्त केल्यामुळे काही काळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.


