मुंबई

Virar Crime News : विरार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; बेवारस मृतदेहाची ओळख पटवून 4 तासांत खुनाचा छडा

•मनवेलपाड्यात झाडीत आढळला मृतदेह, तपास पथकाने आरोपीला काही तासांतच केले जेरबंद

विरार :- विरार पोलिसांनी एका अज्ञात खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या 4 तासांत छडा लावून आरोपीला अटक करत मोठी कामगिरी केली आहे. मनवेलपाडा परिसरातील झाडा-झुडूपात एका तरुणाचा जखमी आणि बेवारस मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवली आणि गुन्हेगाराला जेरबंद केले.

काय घडले होते?

विरार पोलीस ठाण्याला मनवेलपाडा येथील झाडा-झुडूपात एका पुरुषाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार, पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. चौकशीअंती तो मृतदेह नाना-नानी पार्क येथे राहणाऱ्या मेहुल हरेश शहा याचा असल्याचे निष्पन्न झाले. मेहुलच्या कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली.

मेहुलचे काका पंकज परीख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 20 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10.50 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने मेहुलला पुनम नगर चाळ, जलबाववाडी येथील मोकळ्या जागेत नेले. तिथे धारदार हत्याराने त्याच्या पोटात आणि हातावर गंभीर वार करून त्याचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

4 तासांत आरोपी जेरबंद

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या वर्णनानुसार, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. कौशल्यपूर्ण तपास आणि बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. आरोपी अनिकेत विवेक गायकवाड (वय 30) हा नाना-नानी पार्क, मनवेलपाडा येथे राहणारा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन खुनाच्या घटनेनंतर अवघ्या 4 तासांतच त्याला ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त सुहास बावचे आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे वपोनि एल.एम. तुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली आहे. या कामगिरीमुळे पोलीस दलाचे मोठे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0