ठाणे

Thane Metro Update : ठाणे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकारणार! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ट्रायल रन’ यशस्वी

•मेट्रो मार्ग 4 आणि 4अ ची चाचणी, प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्क्यांनी वाचणार; थेट गर्दीतून प्रवास करणार्या ठाणेकरांना दिलासा

ठाणे :- ठाणेकरांच्या बहुप्रतिक्षित मेट्रो (Thane Metro) प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्ग 4 (वडाळा–कासारवडवली) आणि 4 अ (कासारवडवली–गायमुख) या मार्गांच्या ट्रायल रनचा यशस्वी शुभारंभ झाला. यावेळी नेत्यांनी स्वतः मेट्रोतून प्रवास करत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.

प्रवासाचा अनुभव आणि वैशिष्ट्ये

या ट्रायल रनसाठी गायमुख ते विजय गार्डन या टप्प्याची निवड करण्यात आली होती. सुमारे 35 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर एकूण 32 स्थानके प्रस्तावित आहेत. या मेट्रो गाड्या मुंबई मेट्रो मार्ग 2अ आणि 7 वर चालणाऱ्या BEML च्या 6-डब्यांच्या ट्रेन-सेट्सप्रमाणेच असून, त्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. त्यात अत्याधुनिक ट्रेन कंट्रोल सिस्टीम, आपत्कालीन संपर्क यंत्रणा, स्वयंचलित अग्निशमन प्रणाली आणि अडथळा शोध उपकरणे यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये आहेत. या मेट्रोची सर्वात खास गोष्ट म्हणजे, ऊर्जा वाचवणारी ‘पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली’ (Regenerative braking) ज्यामुळे सुमारे 30 टक्के ऊर्जा वाचेल.

प्रवाशांचा वेळ वाचणार

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “मेट्रो 4 आणि 4 अ मुळे ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांतील दळणवळण अधिक सोपे होणार आहे. एकूण 16 हजार कोटी रुपये खर्च होणाऱ्या या प्रकल्पात दररोज 13 लाख 43 हजार प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा मार्ग मुंबईच्या पूर्व उपनगरांना, पश्चिम उपनगरांना आणि ठाणे शहराला जोडणार असल्याने तो देशातील सर्वात लांब, 58 किलोमीटरचा मेट्रो मार्ग बनेल. यामुळे प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्क्यांनी कमी होईल आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी देखील कमी होईल.”

शिंदेंच्या प्रयत्नांचे कौतुक

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. मोघरपाडा येथे मेट्रो डेपोसाठी जागा मिळवून देण्यात शिंदे यांनी मोठी भूमिका बजावली, असे ते म्हणाले. सुमारे 45 हेक्टर जागा मिळाल्यामुळे मेट्रो 4, 4अ, 10 आणि 11 या सर्व मार्गांसाठी डेपोची सोय होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0