Vice President Election 2025 : देशाला आज नवे उपराष्ट्रपती लाभणार; एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन यांच्या विजयाची शक्यता

• सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात, इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडणुकीआधीच मोठा झटका
ANI :- देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज, 9 सप्टेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. आज सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या मतदानात सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. एनडीएने सी.पी. राधाकृष्णन यांना तर इंडिया आघाडीने निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. आकडेवारीनुसार, एनडीएच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे, मात्र भाजप कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही.
मोदींचा खासदारांना विजयाचा कानमंत्र
उपराष्ट्रपती निवडणुकीतील विजयाचे गणित स्पष्ट असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांच्या कार्यशाळेत त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. “बहुमत असले तरी, एकही मत वाया जाणार नाही याची काळजी घ्या,” असा कानमंत्र मोदींनी आपल्या खासदारांना दिला आहे.
इंडिया आघाडीला निवडणुकीआधीच मोठा धक्का
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी निवड मंडळात लोकसभा आणि राज्यसभेचे एकूण 782 सदस्य आहेत. विजयासाठी 391 मतांचा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. बीआरएसचे 4 आणि बीजेडीचे 7 खासदार मतदानाला गैरहजर राहणार आहेत. यामुळे इंडिया आघाडीचे मतांचे गणित बिघडले आहे.
उपराष्ट्रपतीपदाची समीकरणे
सद्यस्थितीत एनडीएचे दोन्ही सभागृहांतील एकूण 425 खासदार आहेत. याशिवाय, वायएसआर काँग्रेसनेही एनडीएला पाठिंबा दिल्याने त्यांची एकूण मते 436 वर पोहोचली आहेत. तर, दुसरीकडे इंडिया आघाडीकडे केवळ 324 मते आहेत. दोन्ही उमेदवारांमध्ये तब्बल 112 मतांचा फरक आहे, त्यामुळे सी.पी. राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
मतदान प्रक्रिया कशी चालते?
या निवडणुकीत मतदान गुप्त पद्धतीने होते. प्रत्येक खासदाराला एक मतपत्रिका दिली जाते, ज्यावर दोन्ही उमेदवारांची नावे असतात. खासदार आपल्या पसंतीनुसार उमेदवाराच्या नावापुढे ‘1’ आणि ‘2’ असे क्रमांक लिहितात. अनेकदा पक्ष आपल्या खासदारांना केवळ एकाच उमेदवाराला ‘१’ असे मतदान करण्याची सूचना देतात, त्यामुळे ‘2’ क्रमांकाचा वापर केला जात नाही. आज संध्याकाळपर्यंत या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.


