Vaibhav Khedekar : मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर; ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे निर्णय

•ओबीसी नेत्यांची नाराजी टाळण्यासाठी भाजपची खबरदारी; पक्षप्रवेशाची पुढील तारीख लवकरच
मुंबई :- मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले कोकणातील नेते वैभव खेडेकर यांचा आज (4 सप्टेंबर) होणारा भाजपमधील प्रवेश तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज्यात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि ओबीसी समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खुद्द वैभव खेडेकर यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर हे भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या, त्यानंतर मनसेने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत हकालपट्टी केली होती. त्यानंतर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन खेडेकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आज होणारा हा कार्यक्रम आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
ओबीसी आंदोलनामुळे भाजपची खबरदारी
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनानंतर ओबीसी समाजाकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नागपूरसह अनेक ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत एखाद्या नेत्याचा पक्षप्रवेश करून ओबीसी समाजाची नाराजी ओढवून घेऊ नये, यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. वैभव खेडेकर यांनीही हा प्रवेश ओबीसी आरक्षण मुद्द्यामुळे स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
‘राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण…’
मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली होती. “मी भाजपच्या काही नेत्यांना भेटलो म्हणून माझ्यावर पक्षांतराचा संशय घेण्यात आला. पण मी पक्षप्रवेश करणार नव्हतो,” असे त्यांनी स्पष्ट केले होते. एका कार्यकर्त्यावरील कारवाई थांबवण्यासाठी आणि विकासकामांसाठी आपण भाजप नेत्यांना भेटत असल्याचे त्यांनी सांगितले होते. राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप भेट मिळाली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.


