BEST Elections : बेस्ट निवडणुकीत पराभव जिव्हारी, ‘शून्य + शून्य बरोबर शून्य’ म्हणत भाजपचा ठाकरे बंधूंवर निशाणा!

•मनसे-ठाकरे गटाच्या युतीला भोपळा; भाजपचा शशांक रावांना स्टार प्रचारकाचा मान
मुंबई :- मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे लढवलेल्या या निवडणुकीत त्यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’ला एकही जागा जिंकता आली नाही. या पराभवानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे, तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणुकीतील विजेते शशांक राव आणि प्रसाद लाड यांना थेट आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी ‘स्टार प्रचारक’ म्हणून घोषित केले आहे.
‘शून्य + शून्य बरोबर शून्य’
बेस्ट निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर आणि मनसेवर जोरदार हल्लाबोल केला. “या निवडणुकीचे राजकारण उबाठा आणि मनसेने केले. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याचे फळ त्यांना मिळाले आणि हाती भोपळा आला,” असे शेलार म्हणाले. “शून्य + शून्य बरोबर शून्य हे मी आधीही म्हणालो होतो, आणि आज ते सिद्ध झाले. आज मुंबईचा विजय झाला, मुंबईकरांचा विजय झाला, मराठीचा विजय झाला, कामगारांचा विजय झाला आणि भाजपचा विजय झाला,” अशा शब्दांत त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.
शशांक राव भाजपचे ‘स्टार प्रचारक’
या विजयानंतर आशिष शेलार यांनी मोठी घोषणा केली. “मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून मी आज जाहीर करतो की, मुंबई महानगरपालिकेच्या स्टार प्रचारकांची मोठी यादी जाहीर होईल, पण त्यात शशांक राव आणि प्रसाद लाड यांची नावे मी आजच जाहीर करत आहे,” असे शेलार म्हणाले. “या दोघांनीच बेस्टच्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षाला मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे आहे, हे दाखवून दिले. मी या दोन्ही पक्षांना सांगतो की, आधी या दोघांशी निपटा आणि मग माझ्याकडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या,” असे थेट आव्हान शेलार यांनी दिले.
मनसेचा पराभव मान्य
दरम्यान, या पराभवानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शशांक राव यांचे पॅनेल निवडून आले, त्यांचे अभिनंदन करतो. 14 लोक निवडून आले. यापुढे बेस्ट पतपेढीचे काम ते व्यवस्थित हाताळतील आणि कामगारांना न्याय देतील अशी अपेक्षा करतो. लाड यांचेही अभिनंदन,” असे ते म्हणाले. “ज्यांचा पराभव झाला त्यांनी पैशांचा वापर झाल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. युद्ध अजून संपलेले नाही,” असे म्हणत त्यांनी भविष्यकाळात आणखी संघर्ष होणार असल्याचे संकेत दिले.


