मुंबई

Mumbai Rain Update : मुसळधार पावसामुळे लोकल आणि रस्ते वाहतूक विस्कळीत ,कुर्ला, माटुंगा, दादरसह अनेक रेल्वे स्थानकांत पाणी साचले; मध्य आणि हार्बर रेल्वे उशिराने

• सायन, हिंदमाता, अंधेरीमध्ये वाहतूक कोंडी; मुंबई आणि ठाण्याला पुढील 48 तासांसाठी ‘रेड अलर्ट’

मुंबई :- गेल्या काही तासांपासून मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ‘24 तास धावणारे शहर’ अशी ओळख असलेल्या मुंबईचा वेग पूर्णपणे मंदावला आहे. रस्त्यांवर आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन सेवा आणि रस्ते वाहतूक दोन्ही विस्कळीत झाली आहे.

लोकल सेवांवर परिणाम

पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. मध्य रेल्वेमार्गावरील कुर्ला, माटुंगा आणि दादर स्थानकांमध्ये पाणी साचल्यामुळे लोकल सेवा 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच, हार्बर रेल्वेमार्गावर चुनाभट्टी, चेंबूर आणि टिळकनगर परिसरात पाणी साचल्याने वाहतूक 12 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे, तर ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या बऱ्यापैकी सुरळीत असली, तरी पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास तीही प्रभावित होण्याची शक्यता आहे.

रस्ते वाहतूकही ठप्प

लोकल प्रमाणेच शहरातील रस्ते वाहतुकीचीही दुरवस्था झाली आहे. दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ आणि किंग्ज सर्कल या सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. तसेच, पश्चिम उपनगरात अंधेरी परिसरातही पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

हवामान विभागाचा रेड अलर्ट

या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्यासाठी पुढील 48 तासांकरिता ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तसेच, पालघर आणि सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण कोकणातही ‘रेड अलर्ट’ असेल. त्यामुळे, मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0