मुंबई

Bhiwandi Crime News : भिवंडी बायपासवर पोलिसांचा ‘एमडी’ ड्रग्जचा मोठा पर्दाफाश; तब्बल 31 कोटी 84 लाखांचे ड्रग्ज जप्त

•महामार्गावर सापळा रचून दोन सराईत आरोपींना वाहनांसह अटक; ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

भिवंडी :- ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम राबवून भिवंडी बायपासवर तब्बल 31 कोटी 84 लाख 80 हजार रुपये किमतीचा 17 किलो 924 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी दोन सराईत आरोपींना वाहनांसह अटक करण्यात आली असून, या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांना मोठा धक्का बसला आहे.

पोलीस आयुक्त, ठाणे शहर,आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखेच्या घटक-2, भिवंडीच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अंमलदार अमोल इंगळे आणि प्रशांत राणे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पूर्व द्रुतगती महामार्गावरील रांजनोली बायपासजवळ दोन इसम अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार आहेत.

या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी आणि मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील आणि अंमलदार यांचा समावेश होता. पोलिसांनी सापळा रचून तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी (वय 23) आणि महेश हिंदुराव देसाई (वय 37) या दोन आरोपींना त्यांच्या वाहनांसह ताब्यात घेतले.

जप्त केलेल्या मुद्देमालात काय?

पोलिसांनी केलेल्या तपासणीत आरोपी तन्वीर अन्सारीच्या डिझायर कारमधून 11 किलो 763 ग्रॅम मेफेड्रॉन आणि महेश देसाईच्या BMW कारमधून 4 किलो 161 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. दोन्ही वाहनांसह एकूण 32 कोटी 20 लाख 10 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यात दोन कार, तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे.

कोनगाव पोलीस ठाण्यात या आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गुन्हे शाखा, घटक-०२ करत आहे. दोन्ही आरोपींवर याआधीही हत्या, दरोडा, आणि ड्रग्ज तस्करीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी हे ठाणे आणि मुंबई परिसरात अंमली पदार्थ विकण्यासाठी आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, ड्रग्जच्या मूळ स्रोताचाही तपास केला जात आहे.

सदर उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव (गुन्हे) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे (गुन्हे, शोध-1) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0