Panvel Crime News : मोबाईल टॉवरमधील बॅटरी चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; पनवेल गुन्हे शाखेची कारवाई

•नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथ परिसरातील 10 गुन्हे उघड; 2 आरोपींना अटक
पनवेल :- नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथ यांसारख्या शहरांमधून मोबाईल कंपन्यांच्या टॉवरमधील बॅटरी चोरणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पनवेल गुन्हे शाखा, कक्ष-2 ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार मोबाईल कंपन्यांच्या टॉवरमधील बॅटरी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्ष-2, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांनी एक विशेष पथक स्थापन केले.
उलवे पोलीस ठाण्यात 27 जुलै 2025 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते, कारण घटनास्थळी कोणतेही पुरावे किंवा साक्षीदार नव्हते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून तपास सुरू ठेवला. या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार हुसेन मोहम्मद सय्यद (वय 32, रा. गोवंडी, मुंबई) याने त्याच्या साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हुसेन सय्यद आणि त्याचा साथीदार मोहम्मद मुख्तार इजाईल मलिक (वय 36, रा. गोवंडी, मुंबई) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण आणि अंबरनाथ या भागांत अशा प्रकारचे 10 गुन्हे केल्याची कबुली दिली.
या यशस्वी कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, माधव इंगळे, सफौ अनिल पाटील, आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी उलवे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांना 13 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसणार आहे.


