मुंबई

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल: “देवेंद्र फडणवीस हे ‘थीफ मिनिस्टर’, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालताय”

•राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना रस्त्यावर; भ्रष्टाचारी मंत्र्यांना हटवेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार

मुंबई :- “आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो, तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे,” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. राज्यातून भ्रष्टाचारी मंत्र्यांना हटवेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. भ्रष्टाचारी लोकांवर टीका करताना ते म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. पण यांना डोकं असेल तर ना, यांना नुसते पाय आहेत, सुरत आणि गुवाहाटीला पळून जायला.” या भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. “मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते. तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, दिल्लीत तुमचे बाप बसले आहेत, तरीही भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही काढून टाकत नाही,” असे ते म्हणाले. काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना ‘थीफ मिनिस्टर’ म्हटल्याचा संदर्भ देत, “हा चांगला शब्द आहे,” अशी टिप्पणीही त्यांनी केली.

‘धनकड’ आणि उपराष्ट्रपतींच्या अनुपस्थितीवरून प्रश्नचिन्ह

उद्धव ठाकरेंनी या वेळी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. भ्रष्टाचाराचे पुरावे असूनही सरकार त्यांना पाठीशी का घालते, असा सवाल करत त्यांनी ‘धनकड’ नावाच्या व्यक्तीचा राजीनामा का घेतला, हे कळले नाही, असे म्हटले. तसेच, चीनमध्ये जसे लोक गायब होतात, तसेच आपल्या उपराष्ट्रपतींचे झाले आहे का? ते कुठे आहेत? त्यांची प्रकृती बिघडली असेल तर कोणत्या रुग्णालयात आहेत? की तुम्ही त्यांचे ‘ऑपरेशन’ केले? याचे उत्तर द्या, असे प्रश्न विचारून त्यांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

शिवसैनिकांना आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदींनी जशी ‘चाय पे चर्चा’ केली होती, तशी आता तुम्ही लोकांशी ‘भ्रष्टाचार पे चर्चा’ करा. भ्रष्टाचारी मंत्री जोपर्यंत हटवले जात नाहीत, तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही.” त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, “तुम्ही थोडे जरी स्वाभिमानी असाल तर वरचा दबाव पाहू नका. कारण इथला दबाव वाढला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल,” असा इशाराही दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0