मुंबई

Festival Public Holiday : गोपाळकाला, अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द

•नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जनाला सुट्टी जाहीर; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या

मुंबई :- राज्य सरकारने मुंबई शहर आणि उपनगरवासीयांसाठी असलेल्या स्थानिक सुट्ट्यांमध्ये मोठा बदल केला आहे. सरकारच्या नवीन शुद्धीपत्रकानुसार, यावर्षीचा गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशी या दिवसांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी, नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जन या सणांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे अनेक शासकीय कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

16 ऑगस्ट 2025 रोजी साजरा होणाऱ्या गोपाळकाला आणि 6 सप्टेंबर 2025 रोजी असलेल्या अनंत चतुर्दशीच्या स्थानिक सुट्ट्यांबाबत 18 डिसेंबर 2024 रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. मात्र, आता गुरुवारी आलेल्या नवीन शुद्धीपत्रकाने हे जुने निर्णय रद्द केले आहेत. नवीन बदलांनुसार, आता शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 रोजी नारळी पौर्णिमेची आणि मंगळवार, 2 सप्टेंबर 2025 रोजी ज्येष्ठगौरी विसर्जनाची सुट्टी असणार आहे.

या शुद्धीपत्रकामुळे मुंबई विद्यापीठाच्या नियोजित परीक्षांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे. 8 ऑगस्ट 2025 रोजी नारळी पौर्णिमेच्या सुट्टीमुळे त्या दिवशी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये फार्मसी, एमएड, एमए आणि एमकॉमच्या परीक्षांचा समावेश आहे. सुधारित परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले आहे.

हा निर्णय मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी, निमशासकीय कार्यालये तसेच शाळा आणि महाविद्यालयांना लागू असेल. सरकारकडून अचानक झालेल्या या बदलांमागे नेमके काय कारण आहे, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप देण्यात आले नाही. मात्र, यामुळे सणांच्या सुट्ट्यांची तयारी करणाऱ्या मुंबईकरांना मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0