मुंबई

Mumbai Crime News : मुंबई विमानतळावर 14 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

•Drugs Seized At Mumbai Airport : बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक; आंतरराष्ट्रीय तस्कर रॅकेटचा सहभाग असल्याचा संशय

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 14 कोटी 50 लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला संशयावरून ताब्यात घेऊन त्याच्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात 14.5 किलो गांजा आढळून आला. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय गांजा तस्करांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

सीमा शुल्क विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला थांबवण्यात आले. त्याच्या ट्रॉलीबॅगमधील कपड्यांमध्ये लपवलेला हा हिरव्या रंगाचा पदार्थ तपासला असता, तो हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची बेकायदेशीर बाजारातील किंमत 14 कोटी 50 लाख रुपये आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बँकॉक मार्गे मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याचे सीमा शुल्क विभागाच्या निदर्शनास आले आहे. पर्यटन स्थळ असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात विमानांची ये-जा असते, याचा फायदा तस्कर घेत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने कमिशनच्या लोभापायी हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

या आरोपीच्या मागील परदेशी प्रवासांची माहिती काढून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. यामागे मोठे आंतरराष्ट्रीय तस्कर गट कार्यरत असल्याचा संशय असून, पोलीस त्या दृष्टीने चौकशी करत आहेत. गेल्या सहा महिन्यांत 100 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा या मार्गाने जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये थायलंडमधील काही भारतीयांचाही सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0