Thane News : बेळगावातील 12 मठाधिपतींचा शिंदे गटात प्रवेश; कर्नाटकात शिवसेनेला बळ देण्याचा प्रयत्न

•उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात पक्षप्रवेश सोहळा; हिंदुत्व आणि अध्यात्मावर भर
ठाणे :- महाराष्ट्रातील राजकारणात पक्षांतराचे सत्र सुरू असतानाच, आता कर्नाटकातही शिंदे गट आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बेळगावातील 12 मठाधिपतींनी आज त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे कर्नाटकातील बेळगावमध्ये पक्षाला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा ठाण्यातील आनंद आश्रम येथे पार पडला. दत्त गगनगिरी ध्यानमंदिराचे मठाधिपती प.पु. पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वाखाली चिकोडी येथील अनेक महाराज शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले. यामध्ये सागर बागडी, नूतन धनावडे, बाळकृष्ण कांबळे, सुवेल शेट्टे, मयूर गुरव, साई पाटील, अनिकेत वरके, सुषमा खरात, दीपा फडणवीस, अरविंद शिरळाकर, दादा महाराज आणि अजय घराडे यांचा समावेश आहे.

‘हिंदुत्व आणि विकास’ हेच आमचे धोरण
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “मागील तीन वर्षांपासून लोकांचा शिवसेनेकडे ओढा वाढत आहे. हिंदुत्व आणि विकासाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत,” असे ते म्हणाले. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हटले की, “महाराष्ट्र हा साधुसंतांचा आहे, मात्र मागील सरकारमध्ये दोन साधुंची हत्या झाली, हे देशाने पाहिले.”
शिंदे यांनी पुढे सांगितले की, त्यांची शिवसेना साधुसंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान श्रेष्ठ असून, हेच अध्यात्मातून पुढे घेऊन जाण्याचे काम साधु-संन्यासीजन करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, या पक्षप्रवेशामुळे बेळगावमध्ये शिंदे गटाची स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.


