पुणे

Pune Crime News : मित्रानेच केला मित्राचा खून! काळेपडळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला केली अटक

दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून केली हत्या, पोलिसांच्या चौकशीत आरोपीने दिली कबुली

पुणे :- काळेपडळ परिसरात एका मित्रानेच आपल्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी घटनेच्या दोन तासांच्या आतच आरोपीला बेड्या ठोकून या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणात विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली होती, तोच व्यक्ती खुनी असल्याचे तपासात उघड झाले.

आज पहाटे 4.52 च्या सुमारास किसन राजमंगल सहा (20 वय) याने डायल 112 वर फोन करून पोलिसांना कळवले की, त्याचा मित्र रविकुमार शिवशंकर यादव (33 वय) याच्यावर चार अनोळखी व्यक्तींनी लोखंडी पहारीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. काळेपडळ पोलिसांना घटनास्थळी पोहोचल्यावर रविकुमार यादव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली असता, तक्रारदार किसन सहाच्या बोलण्यात विसंगती दिसून आली. तसेच, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मोटारसायकलवरून आलेल्या चार व्यक्तींची कोणतीही हालचाल दिसली नाही. यामुळे पोलिसांचा संशय किसनवर बळावला. पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यावर किसनने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, रात्री दारू पीत असताना रविकुमारने त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. यापूर्वीही रवि नेहमीच त्याला मारहाण करायचा. याच रागातून, रविकुमार झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात लोखंडी पहारीने वार करून त्याची हत्या केली.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सपोनि रत्नदीप गायकवाड करत आहेत. ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रगस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार, रत्नदीप गायकवाड, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर, पोलीस हवालदार प्रवीण काळभोर, प्रतीक लाहीगुडे, दाऊद सय्यद, किशोर पोटे, प्रवीण कांबळे, परशुराम पिसे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, सहाम तांबोळी, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, प्रदीप बेडीस्कर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे या विशेष पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0