छत्रपती संभाजी नगर

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त; 7 आरोपींना अटक

अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई; 59 लाखांच्या बनावट नोटांसह 88 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर :- बनावट नोटा तयार करून त्या बाजारात वितरित करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगर तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असलेल्या वाळुंज परिसरात हा बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 59 लाख 50 हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि त्या तयार करण्यासाठी लागणारे आधुनिक छपाई यंत्र, कागद असा एकूण 88 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे, तर या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अंबादास रामभाऊ ससाने (रा. शहरटाकळी, शेवगाव) हा फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर रस्त्यावरील अंबिलवाडी परिसरात बनावट नोटा वितरित करणारे दोघे जण येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून निखिल गांगर्डे आणि सोमनाथ शिंदे यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून पोलिसांनी प्रदीप कापरे, विनोद अरबट आणि त्यानंतर बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यातील आकाश बनसोडे, मंगेश शिरसाठ आणि अनिल पवार यांनाही अटक केली.

या कारवाईत 500 रुपयांच्या बनावट नोटांचा मोठा साठा आढळून आला असून, या रॅकेटचे जाळे अनेक जिल्ह्यांमध्ये पसरलेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले की, “या टोळीकडून जप्त केलेल्या कागदाचा वापर करून आणखी 2 कोटी 16 लाख रुपयांच्या बनावट नोटा तयार करता आल्या असत्या.” फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत असून, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश आहे का, याचा तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0