मुंबई

Kalyan News : कल्याण मारहाण प्रकरणात ‘नवे वळण’! सीसीटीव्हीने उघड केले सत्य, मराठी स्वागतिकेवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता

•रुग्णालयातील बाचाबाचीचा थरार; गोकुळ झाच्या वहिनीला आधी मारहाण झाल्याचे फुटेजमधून स्पष्ट

कल्याण :- कल्याण पूर्वेकडील नांदिवली तर्फ भागातील डॉ. अनिकेत पालांडे यांच्या ‘श्री बाल चिकित्सालया’त सोमवारी संध्याकाळी घडलेल्या मारहाण प्रकरणात आता एक धक्कादायक ‘नवे वळण’ आले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गोकुळ झा आणि त्याच्या भावाला अटक केली असली तरी, रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेल्या माहितीने संपूर्ण प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. गोकुळ झाने स्वागतिकेला मारहाण करण्यापूर्वी, त्या मराठी स्वागतिकेनेच गोकुळच्या वहिनीच्या कानशिलात मारल्याचे सीसीटीव्ही चित्रणातून स्पष्ट झाले आहे.

सोमवारी संध्याकाळी अनन्या झा आपले लहान बाळ घेऊन डॉ. पालांडे यांच्या रुग्णालयात आल्या होत्या. त्यांच्यासोबत पती, वहिनी आणि गोकुळ झा हे देखील होते. डॉक्‍टर रुग्णालयात आल्यानंतर ते औषध विक्रेता प्रतिनिधींसोबत दालनात चर्चा करत होते. झा कुटुंबीयांना लवकर प्रवेश हवा होता, यासाठी ते प्रयत्नशील होते. यावेळी मराठी स्वागतिकेने त्यांना ‘औषध विक्रेते प्रतिनिधी बाहेर आले की मी तुम्हाला सोडते’ असे सांगून दालनाबाहेर थांबवले.

यावरून स्वागतिका आणि झा कुटुंबीयांमध्ये बाचाबाची झाली. याचवेळी गोकुळ झाने स्वागतिकेला शिवीगाळ करत तो बाहेर गेला. मात्र, त्यानंतर संतप्त झालेल्या मराठी स्वागतिकेने आरोपी गोकुळ झाच्या वहिनीच्या कानशिलात मारली. आपल्या वहिनीला रुग्णालयातील तरुणीकडून मारहाण झाल्याचे पाहून बाहेर उभ्या असलेल्या गोकुळ झाचा राग अनावर झाला.

रागाने परत येऊन गोकुळने स्वागत कक्षात उभ्या असलेल्या मराठी तरुणीच्या छातीवर पायाने लाथ मारली. ती खाली पडताच गोकुळने तिच्या केसाला पकडून तिला दोन ते तीन वेळा उचलून आपटले. यावेळी झालेल्या झटापटीत काही रुग्ण नातेवाईक मध्ये पडले आणि त्यांनी गोकुळच्या तावडीतून मराठी तरुणीची सुटका केली.

या प्रकारानंतर डॉक्‍टर दालनातून बाहेर आले. मारहाण झालेल्या तरुणीने तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन गोकुळवर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाला ‘मराठी विरुद्ध परप्रांतीय’ असा रंग आल्याने आणि मनसे, ठाकरे गट, भाजप यांसारख्या राजकीय पक्षांनी यात उडी घेतल्याने पोलिसांनी तातडीने तपास करत मंगळवारी रात्री फरार असलेल्या गोकुळ झा आणि त्याच्या भावाला अटक केली. न्यायालयाने गोकुळला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मराठी तरुणीनेच पहिले झा कुटुंबातील एका महिलेच्या कानशिलात मारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे या प्रांतीय वादाच्या प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता मराठी तरुणीवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या वादांचे आणि त्यातून घडणाऱ्या घटनांचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0