मुंबई

Ambernath News : हेडफोनने घेतले दोन जीव! अंबरनाथमध्ये रेल्वेखाली महिला आणि तरुणाचा मृत्यू

•रुळ ओलांडताना फोनवर बोलणारी महिला रेल्वेखाली; वाचवायला धावलेल्या सहकाऱ्याचा देखील दुर्दैवी अंत

अंबरनाथ :- अंबरनाथ शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना हेडफोन घालून फोनवर बोलणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू झाला, तर तिला वाचवायला गेलेल्या तिच्या तरुण सहकाऱ्यानेही प्राण गमावले. ही दुर्घटना रविवारी 20 जुलै रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोरीवली गावाजवळ घडली.

वैशाली धोत्रे (45 वय) आणि आतिष आंबेकर (29 वय) हे दोघे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील एका कंपनीत सहकारी होते. रविवारी काम संपल्यानंतर आतिष, वैशाली यांना सोडण्यासाठी मोरीवली गावाजवळ आला. ते दोघे रेल्वे रुळ ओलांडत होते. वैशाली या त्या वेळी हेडफोनवर बोलत होत्या. तेवढ्यात समोरून वेगात येणाऱ्या रेल्वेची चाहूलही त्यांना लागली नाही.

प्रवाशांनी आणि आतिषनेही आवाज दिला, पण वैशाली यांचं लक्ष गेलं नाही. आतिष तिला वाचवायला पुढे धावला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांनाही धडक बसली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

आतिष हा आपल्या वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार होता. दोन बहिणींची लग्नं झाली होती. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंब कोसळून गेलं आहे. दुसरीकडे वैशाली यांच्या कुटुंबात 22 वर्षीय मुलगा आणि एक कन्या आहे. त्यांच्या मुलीचं लग्न यंदा ठरलेलं होतं. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबाचा कणा मोडला आहे.

अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारे दोन उड्डाणपूल असून, बी केबिन ते मोरीवलीदरम्यान तिसऱ्या पुलाचं काम अर्धवट आहे. यामुळे रोज शेकडो नागरिक रुळ ओलांडून औद्योगिक वसाहतीकडे जातात. याच भागात वारंवार अपघात घडतात.

या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिकांनी रेल्वे प्रशासन आणि महापालिकेकडे कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत. “प्रत्येक वेळी एखादा जीव गेल्यावरच प्रशासन हलतं, असं का?”, असा रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0