Rohit Pawar On Manikrao Kokate : “मी रम्मी खेळलोच नाही!” म्हणणाऱ्या कृषिमंत्री कोकाटेंचा नवा व्हिडीओ !

•राजीनामा फेटाळताना कोकाटेंचा इशारा – बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचेन!
मुंबई :- राज्यातील रम्मी-राजकारण अजून गडद होत आहे! कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वतःवर लागलेले आरोप पूर्णतः फेटाळून लावत, “मी रम्मी खेळलोच नाही!” असा दावा केला. इतकंच नाही, तर “माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा देत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची मागणी स्पष्टपणे नाकारली.
मात्र, या दाव्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक नवा व्हिडीओ ट्वीट करत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. सुमारे 24 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये, सभागृहात कामकाज सुरू असल्याचे स्पष्टपणे ऐकू येते, आणि त्याचवेळी मंत्री कोकाटे हे काहीतरी मोबाईलवर खेळताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
या व्हिडीओमुळे कोकाटेंच्या बचावात्मक भूमिकेला जोरदार हादरा बसण्याची शक्यता आहे. सभागृहात गंभीर चर्चा सुरू असताना मंत्र्यांचा असला हलगर्जीपणा – तोही जुगारासारख्या खेळाशी संबंधित असल्याचे दाखवणारा व्हिडीओ समोर येणे, ही राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
काय म्हणाले आमदार रोहित पवार?
“राजीनामाद्यावाचलागेल. सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
तसेच “मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी 42 सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.


