Manikrao Kokate : रमीचा व्हिडीओ व्हायरल, पण राजीनामा नाही – कोकाटेंची प्रतिक्रिया!”

•”खोटा आरोप! कोर्टात खेचणार बदनामी करणाऱ्यांना” – मंत्र्यांचा इशारा
नाशिक :- राज्यातल्या विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वादात सापडलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर यावर मौन सोडलं. राजीनाम्याची चर्चा जोरात सुरू असतानाच कोकाटेंनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की, ते कुठलाही राजीनामा देणार नाहीत, उलट ज्या नेत्यांनी बदनामी केली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत.
“मी ऑनलाईन रमी खेळतच नाही. गेम स्कीप करत होतो, पण तुम्ही संपूर्ण व्हिडीओ दाखवलाच नाही. माझं कोणतंही बँक किंवा मोबाईल लिंक रमी अॅपसोबत जोडलेलं नाही,” असं म्हणत त्यांनी आपल्यावरील आरोप फोल ठरवत खळबळजनक इशारा दिला – “माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही!”
मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या चर्चेवर त्यांनी ठाम भूमिका घेत “मी काही गैरकृत्य केलं नाही. ना मी चोरी केली ना कोणाचा विनयभंग. केवळ एक 11 सेकंदांचा व्हिडीओ दाखवून बदनामी केली गेली,” असं ते म्हणाले. शिवाय, “मी दोषी ठरलो, तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना न भेटताच थेट राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन,” असाही निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.
त्याच वेळी ‘कृषी समृद्धी’ या नव्या योजनेची घोषणा करून, कोकाटेंनी राजीनामा चर्चेला एकप्रकारे कलाटणी दिली. पाच हजार कोटींच्या भांडवली गुंतवणुकीचा जीआरही आज प्रसिद्ध झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.


