मुंबई

Palghar Crime News : पालघर पोलिसांची वडराईत अनैतिक मानवी व्यापारावर धडक!

  • दोन महिलांची सुटका, दोन आरोपी अटकेत,गुप्त माहितीवरून रिसॉर्टवर छापा; डमी ग्राहकाने उघड केला सौद्याचा प्रकार

पालघर : पालघर जिल्ह्यातील वडराई परिसरातील एका रिसॉर्टवर सुरु असलेल्या अनैतिक मानवी व्यापारावर पालघर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, दोन पीडित महिलांची सुटका करत दोन आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 14 जुलै रोजी करण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या आदेश पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे वडराई येथील एका रिसॉर्टवर दुपारी 3.40 वाजता सापळा रचला.

यावेळी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून सौद्याची पुष्टी केली. त्यानंतर पल्लवी सुनील अहिरे (47 वय) आणि अजय हरिश्चंद्र इंदुलकर (59 वय), जो की त्या रिसॉर्टचा चालक आहे, यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांकडून पीडित महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलून, ग्राहकांना पुरवण्याचा व्यवसाय केल्याचे निष्पन्न झाले आहे. मिळणारी कमाई ते स्वतःच्या उपजीविकेसाठी वापरत होते.

सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर करत आहेत.

या कारवाईत पोलिसांचे एकूण 18 सदस्यीय पथक सहभागी होते. विशेषतः डमी ग्राहक पाठवण्याची युक्ती, गुप्त माहितीचे त्वरित विश्लेषण आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे ही कारवाई यशस्वी ठरली. पालघर पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे जिल्ह्यातील अनैतिक धंद्यांवर मोठा आघात बसला असून, अशा कारवायांनी गुन्हेगारीला रोख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0