मुंबई

Sanjay Raut : “शिंदेंनी शहांचे पाय धुतले, मुख्यमंत्रिपदाची पुन्हा ऑफर दिली” – संजय राऊतांचा सनसनाटी आरोप

•”शिंदेंचा गट दिल्ली-गुजरातच्या आदेशावर चालतो, शिवसेना नव्हे” – राऊतांचा घणाघात

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने पूजा केली, त्यांचे पाय धुतले, त्यांच्या चरणांवर डोकं ठेवले. याचा फोटो माझ्याकडे नसला तरी संपूर्ण माहिती आहे,” असा दावा राऊतांनी केला.

राऊत म्हणाले, “शिंदे यांनी फडणवीस आमचं काम करू देत नाहीत अशी तक्रार शहांकडे केली आणि त्यानंतर भाजपमध्ये सामील होण्याची पुन्हा ऑफर दिली.” शिंदे यांनी म्हणे, “मला मुख्यमंत्री करा, मी मराठी माणसांची एकजूट थांबवतो,” असा प्रस्ताव शहांसमोर ठेवला होता. मात्र शहांनी मुख्यमंत्री भाजपचाच राहील हे स्पष्ट केल्यावर शिंदे यांनी संपूर्ण गटासह भाजपमध्ये यायची तयारी दाखवली, असं राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले की, “शिंदे गटाचे मुख्य नेते दिल्लीत किंवा गुजरातमध्ये आहेत. ते शिवसेनाप्रमुखांच्या समाधीवर कौल घेऊन निर्णय घेत नाहीत.” शिंदे यांचा दिल्लीत जाण्याचा कार्यक्रम आधीपासून ठरलेला होता आणि त्यामागची माहिती माझ्याकडे नेहमीप्रमाणे आधीपासून आहे, असे राऊतांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, “दिल्लीच्या राजकारणामध्ये मला शिंदेंपेक्षा जास्त माहिती आहे. केंद्रातील तपास यंत्रणांकडे काही गंभीर पुरावे लागले आहेत, लवकरच शिंदे गटातील काहीजण अडचणीत येतील.”

संजय राऊत यांनी राज्य सरकारवर आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, “राज्यात 95 हजार कोटींची कामं टेंडरशिवाय वाटण्यात आली आहेत. यासाठी काही ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात आले. आता अनेक ठेकेदार काम मिळत नसल्यामुळे ते उघड बोलू लागले आहेत, तर काही थेट कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.”

शिवसेनेचेच आमदार संजय शिरसाट यांचा व्हिडिओ मिळाल्याचा दावा करत राऊत म्हणाले, “त्यांच्या बँगमध्ये नोटांचे बंडल दिसत आहेत. ही दृश्ये समाजात जात आहेत. सरकारमध्ये असल्याचा भ्रम फार काळ टिकणार नाही. योग्यवेळी पुरावे गोळा होतात आणि कारवाई होतेच.”राऊत यांनी शेवटी सूचक इशारा देत सांगितले की, “ऑगस्टमध्ये काही मोठ्या घडामोडी घडतील. सध्याची आयकर नोटीस ही केवळ इशारा आहे. राजकीय पातळीवर लवकरच मोठी उलथापालथ पाहायला मिळेल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0