Sanjay Raut : “75 चा आकडा मोदींसाठी वळण की विराम?”भागवतांच्या सूचक विधानावरून संजय राऊतांचा निशाणा

- “निवृत्तीची शाल मोदींच्या खांद्यावर लवकरच” – संजय राऊतांचा टोला
मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात वयाच्या पंचाहत्तरीनंतर निवृत्तीचा संकेत दिला, आणि याच विधानावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “75 वर्षांचा नियम जेव्हा अडवाणी, जोशी यांच्यासाठी लावला, तेव्हा तो मोदींसाठी लागू नये का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी थेट निवृत्तीची वेळ मोदींवर आली असल्याचा दावा केला आहे.
“मोदींनी स्वार्थासाठी नियम लावला, आता तोच नियम त्यांच्यावर लागू होणार”
संजय राऊत म्हणाले, “मोदींनी स्वतःच हा 75 वर्षांचा निवृत्तीचा नियम भाजपात लावला. आडवाणी, जोशी यांना एक झटक्यात बाजूला केलं. आता सप्टेंबरमध्ये मोदी 75 पूर्ण करत आहेत. संघाकडूनच आता त्यांना निवृत्तीचं सूचनं येतंय, असा स्पष्ट संकेत मोहन भागवतांच्या वक्तव्यात आहे.”
“मोदी विसरणार, पण भागवत विसरू देणार नाहीत”
“मोदी जे वचनं देतात ती लवकर विसरतात – 15 लाख, पाकिस्तानचा धडा, महागाईचा प्रश्न… पण ‘निवृत्ती’चं हे वचन ते विसरले तरी देश विसरणार नाही, आणि सरसंघचालक भागवतही विसरु देणार नाहीत”, असं म्हणत राऊतांनी संघ व भाजपमध्ये वाढणाऱ्या अंतर्गत ताणावर सूचक भाष्य केलं.
“मुंबईसाठी राज-उद्धव एकत्र यावेत”
याशिवाय, मुंबईच्या राजकारणावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, “मुंबई वाचवायची असेल, मराठी माणसाच्या हक्कांसाठी उभं राहायचं असेल, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत. हीच लोकभावना आहे.”
दीपक केसरकर यांच्यावरही त्यांनी जहरी टीका केली. “दहा पक्ष फिरलेला माणूस उद्धव ठाकरेंनी मंत्री केला, आणि आज तोच उलट प्रश्न विचारतो. तो मोती तलावावरचा कावळा आहे,” असा घणाघात करत राऊतांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या स्पष्ट भूमिकेचा इशारा दिला.


