Vijayi Melava : मराठीसाठी एकत्र! वरळीत उद्धव-राज ठाकरेंचा शक्तीप्रदर्शन मेळावा

•आमचं एकत्र दिसणं हाच खरा संदेश!” – उद्धव ठाकरे;
“मराठीची एकजूट कायम राहो!” – राज ठाकरे
मुंबई | हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राच्या विरोधात राज्यभर तापलेल्या वातावरणात अखेर राज्य सरकारने माघार घेतल्यानंतर, मराठीचा आवाज बुलंद करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) ने आज (5 जुलै) मुंबईच्या वरळी येथे विजयी मेळाव्याचं आयोजन केलं. या मेळाव्यात सर्वात मोठा लक्षवेधी क्षण ठरला – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र व्यासपीठावर येणं आणि स्पष्ट संकेत देणं की, ही एकता मराठीसाठीच्या पुढील लढ्यांची नांदी ठरेल.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करत, दोघांतील संबंध सुधारल्याचे चित्र उभं केलं. “राजने भाषणाची सुरुवात ‘सन्माननीय’ असं म्हणत केली, त्यामुळे मीही त्याचा उल्लेख ‘सन्माननीय राज ठाकरे’ असाच करतोय,” असं म्हणत उद्धव यांनी भावनिक सुर लावला.
तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, “आमचं एकत्र दिसणं हाच खरा संदेश आहे. भाषणांपेक्षा तो महत्त्वाचा आहे. अण्णाजीपंतांनी आमच्यातलं अंतर दूर केलं आहे. आता आम्ही दोघं एकत्र आलोय – एकत्र राहण्यासाठी.”
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सामाजिक अंधश्रद्धा, बुवाबाजी, अंगारे-धुपारे करणाऱ्यांवरही टीका करत म्हणाले, “आज अनेक बुवा, महाराज विविध प्रकारात व्यस्त आहेत. कोणी लिंबू कापतोय, कोणी अंगारे करतोय. पण, माझ्या आजोबांनी – प्रबोधनकार ठाकरे यांनी या बोंदूपणाविरोधात लढा दिला होता. त्यांचेच वारस म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत.”
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाषणात मराठीसाठी एकजूट टिकवण्याचा संदेश दिला. “हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला गेला असला तरी पुढे काय होईल, माहित नाही. त्यामुळे मराठीसाठी आपली एकजूट आवश्यक आहे. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पुन्हा साकारावं, अशी माझी इच्छा आहे,” असं ते म्हणाले.


