
Eknath Shinde Latest News : मोदी-शाह आमच्यासाठी एकच आहेत; त्यांच्या स्पर्शाने कार्याला सोनं चढतं” – एकनाथ शिंदे
पुणे | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात शिंदे यांनी ‘जय गुजरात’चा नारा देत गुजरात समाजाचे आणि अमित शाह यांचे जाहीर कौतुक केले. जयराज स्पोर्ट्स आणि कन्वेन्शन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कार्यपद्धतीची स्तुती करत भाजपशी आपला सुसंवाद अधोरेखित केला.
“आजचा दिवस गुजराती समाजासाठी ऐतिहासिक आहे. इथे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही कारण तुम्ही सर्वजण लक्ष्मीपुत्र आहात,” अशा शब्दात शिंदेंनी उपस्थित गुजराती बांधवांना उद्देशून भाषणाची सुरुवात केली. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मोदीजींच्या हस्ते ज्या कामाचं भूमिपूजन होतं, ती कामं वेगाने पूर्ण होतात. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड ही उदाहरणं आहेत. या वास्तूचं भूमिपूजन मोदीजींनी केलं आणि आज उद्घाटन अमितभाईंच्या हस्ते होतंय.”
यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची प्रशंसा करताना म्हटलं की, “मोदीजींची सावली म्हणजे अमितभाई आहेत. त्यांच्या कार्यशैलीत संकल्प आणि दृढता आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा निर्णय हे त्यांचं ऐतिहासिक योगदान आहे. त्यांचं राष्ट्रहितासाठीचं योगदान अपार आहे. ते आव्हानाला संधी मानतात आणि अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात.”
व्यापारी वर्गालाही उद्देशून शिंदे म्हणाले, “व्यवसाय व बाजारपेठ नसलेल्या शहरांची शोभा अपूर्ण असते. ती शोभा तुम्ही व्यापारी वाढवता. त्यामुळे तुमचं योगदान अमूल्य आहे.”
कार्यक्रमात जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या पुढील विस्ताराचे संकेतही शिंदेंनी दिले आणि गुजरात समाजासोबत भावनिक नातं अधोरेखित करत ‘जय गुजरात’चा नारा दिला


