मुंबई

Vasai Unauthorised Construction : वसई-विरारमधील अनधिकृत बांधकाम प्रकरणात ईडीची धडक कारवाई

•रेड्डी यांच्या घरी सापडलेल्या 32 कोटींच्या मालमत्तेनंतर चौकशीचा फडशा

वसई, विरार | अनधिकृत बांधकाम घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) वसई-विरार परिसरातील वास्तुविषारद (आर्किटेक्ट) व नगररचना विभागातील अभियंत्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या या धाडसत्रात वसई आणि मुंबईतील तब्बल 12 ठिकाणी ईडीचे अधिकारी धाड टाकत असून, या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई माजी नगररचना संचालक वाय. एस. रेड्डी यांच्या विरोधातील तपासाच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. 14 मे रोजी ईडीने रेड्डी यांच्या वसई, विरारमधील मालमत्तांबरोबरच हैदराबादमधील निवासस्थानी छापे टाकून तब्बल 8 कोटी 6 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 23 कोटी 25 लाख रुपयांचे दागिने व सोने जप्त केले होते. या चौकशीत समोर आलेल्या आर्थिक व्यवहाराच्या माहितीवरूनच आता संबंधित आर्किटेक्ट्स आणि अभियंत्यांवर ईडीने कारवाईचा फास आवळला आहे.

विशेष म्हणजे, नालासोपाऱ्यातील अग्रवाल नगरी भागातील 41 अनधिकृत इमारतींना परवानगी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार, सोन्याच्या स्वरूपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याच प्रकरणात माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात ईडीकडे तक्रार केली होती. त्यानंतर ईडीने मार्चपासून चौकशीचा धडाका सुरू केला होता.

रेड्डी यांच्यावरील कारवाईनंतर काही वास्तुविषारद परदेशातही गेले होते. मात्र प्रकरण निवळल्याचे समजून ते पुन्हा परतले आणि आता ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. यासंबंधीचा अधिकृत तपशील अद्याप ईडीकडून जाहीर करण्यात आलेला नसला, तरी ही कारवाई आणखी मोठ्या घोटाळ्याचा सूचक इशारा देत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0