CM Devndra Fadnavis : आणीबाणी म्हणजे संविधानाची गळचेपी – मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात

CM Devendra Fadanavis On Anibani : अनुशासनाच्या नावाखाली देशात उन्माद माजवण्यात आला”,“लोकशाही जपण्यासाठी आम्ही संघर्ष केला, आजची मोकळीक त्याच संघर्षाची फळं”
मुंबई | आणीबाणीच्या 50 वर्षांच्या पार्श्वभूमीवर आयोजित संविधान हत्या दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या काळातील भयावह वास्तवावर प्रकाश टाकत तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेले संविधान त्या काळात संपवले गेले. विरोधकांना जेरबंद करण्यात आले. अविवाहितांवरही कुटुंब नियोजनाची सक्ती करण्यात आली. वृत्तपत्रांवर अंकुश लावून वास्तव लपवले गेले,” अशी स्पष्ट टिप्पणी त्यांनी केली.

त्यांनी पुढे सांगितले की, ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिज भूमिगत झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ किती अमानुष होता, हे विसरता कामा नये. “त्यांच्या भावाला जबर मानसिक धक्का बसला. तुरुंगात डांबलेल्या कार्यकर्त्यांची घरं उध्वस्त झाली. म्हणूनच आम्ही 2017 मध्ये लोकशाही रक्षकांना मानधन देण्याचा निर्णय घेतला,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आजच्या लोकशाहीची प्रकर्षाने तुलना करताना फडणवीस म्हणाले, “आज तुम्ही कुठल्याही चौकात उभं राहून पंतप्रधानांवर टीका करू शकता, त्यावर कारवाई होत नाही. हीच जिवंत लोकशाही आहे. पण हे स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही. लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही संघर्ष केला, त्यातूनच आजचा मोकळा श्वास मिळतोय.”मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विविध लोकशाही लढ्याचे साक्षीदार आणि मान्यवर उपस्थित होते.


