
Dhananjay Munde On Manoj Jarange Patil : “ओबीसींना गोळ्या घाला आणि संपवून टाका!” मुंडेंचा आक्रमक पवित्रा
बीड :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्या आरोपांना केवळ उत्तरच दिले नाही, तर थेट पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत म्हटले, “मुंडेंना संपवून टाकेन म्हणतात. मला संपवून टाकेल असं ऑन एअर म्हणत असतील तर काय कारवाई होईल? सरकार काय करणार आता? कायदा नाही का?” त्यांनी जरांगे यांच्या धमक्यांकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप करत सवाल केला, “धन्याचं बी ठेवायचं नाही. ही धमकी नाही? धनंजय मुंडेंचं बी सुद्धा ठेवायचं नाही. ही धमकी कुणी दिली? वंजारी जातीचं बी सुद्धा ठेवायचं नाही. ओबीसींचं सर्व बीला बी ठेवायचं नाही ही धमकी कुणी दिली?”
मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल, पण इथली पोलीस यंत्रणा कोणत्याही जाती धर्माचे असो यांना घाबरून आहे. म्हणूनच कर्ते करवते तेच (जरांगे) आहेत.” त्यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान देत म्हटले, “सरकार त्यांचंच ऐकत असेल तर अख्ख्या ओबीसींनी गोळ्या घाला आणि संपवून टाका आम्हाला. सर्व यंत्रणा तुमच्या म्हणण्याने चालत असतील तर संपवा आम्हाला. फक्त तुम्हीच राहा.”
टार्गेटिंगवर प्रश्न
मुंडेंनी आपल्याला टार्गेट केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. “सर्वांचाच टार्गेट धनंजय मुंडे का? एवढ्या जणांना मी आवरला जात नाही का? कमाल आहे. त्या दिवशीच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुद्दा काढला त्याचा राग आला की मी चष्मा पाठवला नाही याचा राग आला. मी काय कोव्हिड व्हायरल झालो काय आता? एका मंत्र्याला माझ्यापासून धोका.”
यासोबतच, जरांगे यांच्या मेव्हण्यांच्या वाळूच्या ट्रकचा मुद्दा उपस्थित करत मुंडेंनी सरकारला सवाल केला, “तुमच्या मेव्हण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले. मी सरकारला विचारणार आहे. त्यात काय कारवाई झाली?” त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर संवैधानिक पदावरील लोकांची आयमाय काढत असल्याचा आरोप करत, या सर्व गोष्टी न समजायला आम्ही खुळे नाही, असे ठणकावले.
या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण केले आहे.


