Mumbai Hookah Parlour : ‘एस्केप’ हुक्का पार्लरचा नशेचा अड्डा! अंबोली पोलिसांची सापत्न भूमिका उघड

•अल्पवयीन मुलामुलींना ड्रग्ज व दारू; लैंगिक शोषणाच्या घटनांनंतरही कारवाई नाही
मुंबई जितिन शेट्टी : अंधेरीतील शास्त्रीनगर परिसरात, इनफिनिटी मॉलसमोर असलेल्या क्रिस्टल प्लाझामधील ‘एस्केप हुक्का पार्लर’मध्ये सुरू असलेला अवैध नशेचा बाजार आणि त्याला मिळणारे अंबोली पोलिसांचे वरदहस्त उघडकीस आले आहे. के.एल. वालावलकर मार्गावर असलेला हा हुक्का पार्लर रात्रीपासून पहाटे ६ पर्यंत सुरू असतो, आणि त्यात कॉलेजवयीन तरुण, अल्पवयीन मुला-मुली यांच्यावर एमडी ड्रग्स, नकली दारूचा मारा केला जातो, तर अनेक मुलींचे लैंगिक शोषणही होत असल्याची माहिती उघड झाली आहे.

अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे या पार्लरचा मालक अशोक शेट्टी याचा उन्मत्त दावा – “कोणीही माझा पार्लर बंद करू शकत नाही. अंबोली पोलिस मला सॅल्यूट करतात. मी दर आठवड्याला 1 लाख रुपये देतो,” असे तो उघडपणे सांगत आहे. एवढेच नव्हे, तर “माझ्या पार्लरमध्ये येऊन नशेत धुंद मुलींचा ‘आनंद’ घ्या” असे अश्लील आमंत्रणही तो देतो आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचे आदेश दिलेले असतानाही, मुंबईतील अंबोली परिसरात हे पार्लर निर्भीडपणे सुरू असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, अंबोली पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, हा प्रश्न आता जाहीरपणे उपस्थित केला जात आहे.
या पार्लरमुळे शास्त्रीनगर, अंधेरी पश्चिम परिसरातील सामाजिक वातावरण ढासळले आहे. अनेक तरुणांचे आयुष्य नशेमुळे बरबाद होत आहे, आणि पालकांच्या डोळ्यांसमोर हे घडत असूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी ज्या विभागात हुक्का पार्लर चालवले जातात, तिथले वरिष्ठ अधिकारी निलंबित होतील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता अंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी निलंबित होतील का? हाच खरा प्रश्न उभा राहतो.


