Raj Thackeray Birthday : राज ठाकरे यांना फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा; वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण

•फडणवीस-राज ठाकरे यांची बंद खोलीतील भेट चर्चेत!
मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. “महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” अशा शब्दांत फडणवीसांनी एक्स (Twitter) या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली.
या शुभेच्छा देण्याच्या दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची जवळपास दीड तास खाजगीत बैठक झाली होती. या बैठकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना जोर चढला आहे. विशेषतः आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप राज ठाकरे यांना आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात असल्याची कुजबुज सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध बिघडवत राज भाजपसोबत युती करणार का, याबाबतही तर्क-वितर्क रंगले आहेत.
मनसे प्रमुखांचा वाढदिवस कार्यकर्त्यांविनाच; कुटुंबासोबत खास वेळ
दरम्यान, राज ठाकरे यांनी यंदा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांना भेट न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईबाहेर कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी त्यांनी कार्यक्रम टाळला असून, कार्यकर्त्यांनी याचा वेगळा अर्थ लावू नये, असं आवर्जून सांगितलं आहे.
मात्र, आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून राज ठाकरे यांनी एक विशेष संदेश दिला – “जर तुम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या भागात काही लोककल्याणकारी उपक्रम राबवले, तर मी समजेन की तुम्ही माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा केला आहे.”
सामान्यतः या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी येतात. पण यंदा वेगळ्या निर्णयामुळे वाढदिवस राजकीय आणि सामाजिक पातळीवर वेगळ्याच चर्चा घेऊन आला आहे.



