Mumbai News : डिलिव्हरीसाठी निघालेला, मृत्यूला गाठलेला! महापालिकेच्या गाडीखाली चिरडून अजीमचा अंत

•अंधेरीच्या मध्यवर्ती चौकात भरधाव घनकचरा वाहनाची धडक; 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
मुंबई :– शहरात घडलेली आणखी एक धक्कादायक घटना. फक्त काही क्षणांनी ग्राहकापर्यंत डिलिव्हरी पोहोचवणारा अजीम शेख (35 वय) आज घरीच परतला नाही. कारण, महापालिकेच्या भरधाव वेगाने धावणाऱ्या घनकचरा वाहनाने त्याच्या आयुष्याची वाटच चिरडली.
बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजता अंधेरी पश्चिमेतील वालावलकर चौकाजवळील मस्जिद अल सलाम भागात ही दुर्घटना घडली. महापालिकेचे मिनी कॉपॅक्टर वाहन (MH 02 ER 5390) प्रचंड वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या अॅक्टिव्हा दुचाकीवर (MH 02 BX 7140) थेट आदळले.
या भीषण धडकेत अजीम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अजीम हा गोरेगाव येथील रहिवासी असून, ‘ब्लिंकीट’मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच वाहनचालक प्रकाश यादव (40 वय) याला ताब्यात घेतले. त्याच्यावर मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 106 आणि भारतीय न्याय संहिता कलम 281 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


