Mumbai Airport Bomb Threatening News : विमानतळावर बॉम्ब! धमकी दिल्यानंतर मुंबईत खळबळ, एकजण अटकेत

•फोनवरून दिली ‘2 वाजेपर्यंत उडवून टाकतो’ अशी धमकी
मुंबई :- “विमानतळाला बमने उडवून टाकीन!” — मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये आलेल्या या एका फोन कॉलने खळबळ उडाली. परंतु पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य धोका टळला. या प्रकरणात मनजीत कुमार गौतम (35 वय) या इसमाला अटक करण्यात आली आहे. तो सध्या मुंबईच्या साकीनाका भागात राहत होता.
मंगळवारी दुपारी 2 वाजेपर्यंत विमानतळ उडवण्याची धमकी दिल्यानंतर लगेच सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली. मनजीतचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेपूर्वी 19 मे रोजीही अशाच स्वरूपाचा एक फोन पोलिसांच्या 112 हेल्पलाइनवर आला होता. “कोणी तरी मुंबईला उडवण्याची योजना करत आहे,” असा दावा करणाऱ्या कॉलरविरुद्ध नंतर अफवा पसरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
फेब्रुवारीमध्ये देखील चेंबूर पोलिस ठाण्याला उडवण्याची धमकी मिळाली होती. प्रत्येकवेळी बॉम्ब शोध पथक, एटीएस व स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत. आतापर्यंत कोणताही स्फोटक पदार्थ सापडलेला नाही.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, खोट्या धमक्यांपासून दूर राहा — अन्यथा कायद्याच्या कचाट्यात सापडाल!



