नांदेड

Nanded News : “बाळासाहेब असते तर मोदींचं कौतुक केलं असतं! — अमित शहांचा नांदेडमधून उद्धव सेनेवर घणाघात

“दहशतवाद्यांना धडा शिकवणं म्हणजे बारात?” — सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळावर टीकेबाबत केंद्राचा संताप

“शिवसेनेला गद्दारांनी भ्रष्ट केलं!” — शाह यांच्या टिकेला दानवेंचं प्रत्युत्तर

नांदेड :- “जर बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते, तर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेनंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली असती,” असं खळबळजनक विधान केंद्रीय गृह मंत्री अमित शहांनी नांदेडमधील एका जाहीर सभेत केलं. या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा भारताच्या दहशतवादाविरोधातील निर्णायक आणि निर्भीड पाऊल आहे, असं सांगत शाह यांनी शिवसेना-यूबीटीवर थेट निशाणा साधला.

शाह म्हणाले, “भारताने सात सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळं आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठवून पाकिस्तानच्या षड्यंत्रांविरोधात ठाम भूमिका मांडली. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यालाच ‘बारात’ म्हणत देशाच्या प्रतिमेला धक्का दिला.” त्यांनी खंत व्यक्त करत म्हटलं, “ज्या प्रतिनिधीमंडळांचा भाग स्वतःचे सदस्य आहेत, त्यांनाच उद्धवसेना हिणवते — हे राष्ट्रहिताच्या विरोधात आहे.”

याच भाषणात शाह यांनी टोला लगावत म्हटलं, “शिवसेना नावाने उरलेली ही यंत्रणा आता केवळ राजकीय सोयीचा मुखवटा झाली आहे. खरे बाळासाहेब असते, तर आजचे हे ‘गद्दार’ दरवाजाबाहेरसुद्धा उभं राहू शकले नसते.”

दरम्यान, शाह यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना शिवसेना-ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ‘एक्स’वर लिहिलं, “शिवसेनेला गद्दारांनी गिळलं आहे, आणि हेच लोक बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार गमावले आहेत.” त्यांनी सवाल उपस्थित केला की, “ज्यांनी हिंदूंचा धर्म विचारून हत्या केल्या, त्या सहा अतिरेक्यांचं काय? आणि देश एकवटलेला असताना, पाकिस्तानशी संघर्षविरामाचा आग्रह कोणी केला?”

राज्याच्या राजकारणात जोरदार घमासान सुरु असताना, नांदेडच्या या भाषणाने शिवसेना-भाजप यांच्यातील कटुता आणखी गहिरी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शाब्दिक युद्ध कोणत्या दिशा घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0