मुंबई

Maharashtra Politics : “दहशतवादाविरुद्ध भारताची जागतिक मोहीम – शिवसेना (ठाकरे)चा ठाम पाठिंबा!”

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीवर चर्चा, खासदार प्रियांका चतुर्वेदी शिष्टमंडळात भारताचं प्रतिनिधित्व करणार

मुंबई :- पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असतानाच, भारताने आता जागतिक स्तरावर पाकिस्तानप्रायोजित दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी व्यापक आंतरराष्ट्रीय मोहिमेची सुरुवात केली आहे. यामध्ये देशातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने सहभाग नोंदवला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील या शिष्टमंडळाचा भाग असणार आहेत.

ही बाब स्पष्ट करण्यासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संपर्क साधला. ही मोहीम केवळ दहशतवादाविरोधात असून त्यात कोणताही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवत, शिवसेना (ठाकरे) ने”देशाच्या हितासाठी आम्ही सदैव सरकारसोबत आहोत” असा ठाम पवित्रा घेतला आहे.

शिवसेनेने म्हटले आहे की,”पाकिस्तानप्रायोजित दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी देशाने एकदिलाने उभे राहणे गरजेचे आहे. लष्कराची कारवाई ही राष्ट्रहितासाठी आहे, त्यावर कोणतीही दुजाभावाची भूमिका नको.”

तसेच, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांच्या अपयशावर प्रश्न उपस्थित करत, पक्षाने देशांतर्गत चर्चेत त्या विषयावर कठोर प्रश्न विचारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या आवाजात एकात्मता आवश्यक असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

शिष्टमंडळाच्या नियोजनात पारदर्शकतेचा अभाव राहिल्याची नोंद घेत, पक्षाने केंद्र सरकारकडे “पक्षांना पूर्वसूचना देण्याचा योग्य प्रोटोकॉल पाळावा”अशी विनंतीही केली आहे.

या साऱ्या घडामोडींनंतर पक्षाने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची मागणी केली आहे. यामध्ये पहलगामपासुन ‘ऑपरेशन सिंदूर’ पर्यंत सर्व घडामोडींवर चर्चा व्हावी, अशी भूमिका मांडली आहे.

शिवसेना (ठाकरे)ने शेवटी ठाम शब्दांत सांगितले,“दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी आम्ही देशासोबत आहोत – हे केवळ राजकीय समर्थन नाही, ही राष्ट्रभक्तीची शपथ आहे!” जय हिंद! भारत मातेचा विजय असो!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0