Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकीच्या हत्येतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला धमकीचा फोन, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा पोलिसांना संशय
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तपासात सातत्याने प्रगती होत आहे. अशा परिस्थितीत दररोज येणारे धमकीचे फोन त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहेत.
मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी Baba Siddique Murder Case यांच्या हत्या प्रकरणातील एका प्रत्यक्षदर्शीला धमकीचा फोन आला आहे. ही धमकी लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी तक्रारीच्या आधारे खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरच्या रात्री हत्या करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता, असे प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. या व्यक्तीने प्रत्यक्षदर्शीकडे फोनवरून 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खान आणि झीशान सिद्दीकी यांनाही धमकीचा फोन आला होता. हा फोन झीशानच्या ऑफिसमध्ये आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा येथून एका व्यक्तीला अटक केली होती.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. 26 ऑक्टोबर रोजी पंजाबमधील लुधियाना येथून 15 व्या आरोपीला अटक करण्यात आली होती. सुजीश सुशील सिंग असे त्याचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा वेगवेगळ्या कोनातून तपास करत आहेत.